संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेच्या सभागृहात काल झालेल्या घुसखोरीची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. संसद घुसखोरी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून लोकसभा सचिवालयाने या प्रकरणी ८ कर्मचा-यांना निलंबीत केले आहे. सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका या कर्मचा-यांवर ठेवण्यात आला आहे. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमीत आणि नरेंद्र अशी या कर्मचा-यांची नावे आहेत.
एकीकडे आरोपींवर कारवाई होत असताना दुसरीकडे संसदेच्या सुरक्षेमध्ये कुचराई झाल्याची बाब विरोधकांनी लावून धरली आहे. यासंदर्भात कोण दोषी आहेत, त्यांच्यावर दोषनिश्चिती करणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी यावर निवेदन देणे या सर्व मागण्या विरोधी पक्षांनी जोरकसपणे लावून धरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता लोकसभा सचिवालयाकडून या घुसखोरीसाठी ज्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरले अशा आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे होत असल्याच्या कालच्या दिवशीच, काही तरुणांंनी संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेदून आता प्रवेश केला. त्यांनी संसदेच्या आवारात व लोकसभेत धूर हल्ला केला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या यातील आरोपींची नावंही समोर आली आहेत. त्यानुसार पोलिसांनी आत्तापर्यंत या लोकसभा घुसखोरी प्रकरणात सागर शर्मा, डी मनोरंजन, नीलम आझाद व अमोल शिंदे या चौघांना अटक केली आहे. याशिवाय ललित झा व विकी शर्मा अशा नावाच्या दोन इसमांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर यूएपीए कलमाखाली अटक करण्यात आली आहे.