तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. ओब्रायन यांच्यावर सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे, राज्यसभेत गोंधळ घातल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर तासाभरात विरोधीपक्षाच्या खासदारांनी संसदेच्या सुरक्षाभंगावर चर्चा करावी, अशी मागणी लावून धरली. सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी खासदारांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याची मागणी केली. यासाठी २८ नोटिसा पाठवल्या. पण राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी संबंधित नोटीस नाकारली. यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या समोरील बाजूस येत गदारोळ केला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणी उत्तर द्यावे , शी मागणी केली.
दरम्यान सभापती जगदीप धनखड यांनी सर्व खासदारांना आपल्या जागेवर बसण्यास सांगितले. मात्र ओब्रायन यांनी घोषणाबाजी चालूच ठेवली त्यामुळे सभागृहाचे काम विस्कळीत झाले.त्यामुळे धनखड चिडले आणि डेरेक ओब्रायन यांच्यावर असभ्यपणाचा ठपका ठेवत त्यांना बाहेर जायला सांगत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.