संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे काळ घडलेल्या घुसखोरी प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटले. या प्रकरणावरुन लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळे तब्बल १५ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.कारवाई करताना सभागृहात असभ्य वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी आज संसदेत जोरदार हंगामा केल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला .लोकसभेच्या १४ आणि राज्यसभेचा एक अशा एकूण 15 खासदारांचे आज निलंबन करण्यात आले आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिवेशनात आता पुढे ते सहभागी होऊ शकणार नाहीत.त्यामध्ये बहुतांश खासदार हे काँग्रेसचे आहेत.
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावे अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. त्यावेळी संसदेत मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणानंतर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल या १५ खासदारांचे निलंबन करण्यात येत असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले आहे.
‘या’ खासदारांचे झाले निलंबन
लोकसभा – माणिकम टागोर, कनिमोळी, पीआर नटराजन, व्ही के श्रीकांतम, बेनी बहन, के सुब्रमण्यम, एसआर प्रतिभा, एस व्यंकटेश, मोहम्मद जावेद, टीएन प्रतापन, हिबी इडेन, ज्योतीमनी, रम्या हरिदास, डीन क्युरिकोस.
राज्यसभा – राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस खासदार दारेक ओब्रायन. निलंबनानंतर ओब्रायन यांनी संसदेच्या आवारात मूक निषेध आंदोलन केले