राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध निर्णय, कायदे, विधेयकांवर पक्ष विरहित वैचारिक चर्चा घडवून आणण्यात महाराष्ट्र विधीमंडळ हे संसदीय परंपरेत उच्चस्थानी आहे आणि ही परंपरा निर्माण करण्यात विधिमंडळाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परातील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या विषयावर राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात मार्गदर्शन करताना श्री. दानवे बोलत होते. यावेळी विधानमंडळ सचिव श्री. विलास आठवले उपस्थित होते.
श्री. दानवे म्हणाले, द्विसभागृहामध्ये विधानपरिषद वरिष्ठ तर विधानसभा कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. दोन्ही सभागृहे एकमेकास पूरक असून विधिमंडळात वरिष्ठ सभागृहाला महत्वाचे स्थान आहे. कनिष्ठ सभागृह नेहमीच वरिष्ठ सभागृहाचा सन्मान ठेवते. कनिष्ठ सभागृहाने घेतलेल्या निर्णयावर या सभागृहात चिकित्सक पद्धतीने चर्चा घडवून आणली जाते. एखाद्या विधेयकांवर, कायद्यांमध्ये वरिष्ठ सभागृह बदल सुचवून ते पुन्हा कनिष्ठ सभागृहाकडे पाठवते. कनिष्ठ सभागृह याचा आदर करून याबाबत सकारात्मक प्रतिसाद देते. यातूनच द्विसभागृह पद्धतीचे महत्व अधोरेखित होते.
द्विसभागृहाचे वैशिष्ट्य सांगताना श्री. दानवे म्हणाले, दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे बहुमत कमी-अधिक असले तरी येथे कोणाचे व्यक्तिगत मतभेद नसतात. दोन्ही सभागृहातील सदस्य जनतेच्या समस्या सभागृहात मांडत असतात. विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात समन्वयाने काम करुन जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात.