दिन दूर नही खंडित भारत को पुन्हा अखंड बनायेंगे
गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व बनायेंगे
उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसे बलिदान करे
जो पाया उसमे खो न जाये, जो खोया उसका ध्यान करे ”
या अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेला साजेसे असे सरदार वल्लभ भाई पटेल यांनी आपले जीवन व्यतीत केले. आपला देश एक उदयोन्मुख, जागतिक सत्ता म्हणून नावारूपाला आलेला आहे. या पाठीमागे एक सक्षम, खंबीर नेतृत्व म्हणून भारताचे *’ लोहपुरुष ‘* सरदार वल्लभ भाई पटेल यांचे नाव घेता येईल. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा छोटासा लेख.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म *नडियाद* येथे *३१ ऑक्टोबर १८७५* ला झाला. ब्रिटिश वसाहतवादी राजवटी विरुद्ध मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन यासारख्या अहिंसक सविनय कायदेभंग चळवळींमध्ये आपली प्रमुख भूमिका बजावली. सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी, दारूबंदी, अस्पृश्यता व महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढा इत्यादी ऐतिहासिक कामें सदैव स्मरणात राहतील.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकोट, जुनागड, बहालपूर, बडोदा, काश्मीर, हैदराबाद ही मूळ राज्ये भारतीय संघराज्यात कशी समाविष्ट करायची हा ज्वलंत प्रश्न भारतासमोर होता. पण हे गुंतागुंतीचे काम सरदार पटेल यांनी कोणताही रक्तपात न करता अगदी सहजतेने सोडविला. स्वतंत्र भारतात ५०० हून अधिक संस्थानांचे एकत्रीकरण करण्याच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे देशाची *प्रादेशिक एकता* सुनिश्चित झाली. या अतुलनीय कामगिरीमुळे सरदार पटेल यांना *”आधुनिक भारताचे शिल्पकार”* म्हणून संबोधले जाऊ लागले. स्वतंत्र भारताचे सरदार पटेल हे पहिले उपपंतप्रधान होते. त्यांना भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान मिळाला असता, पण गुरुस्थानी मानलेल्या महात्मा गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली.
भारतीय इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते सामाजिक न्याय आणि समतेचे कट्टर पुरस्कर्ते होते.
देशाची एकता अखंडता टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य या निस्वार्थ सेवेचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांची जयंती ही भारतात *”राष्ट्रीय एकता दिन”* म्हणून साजरी केली जाते.
*”स्टॅच्यू ऑफ युनिटी”* ही भारतातील गुजरात राज्यात असलेला सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा. त्यांचे भव्य स्मारक हे भारताच्या एकता व सार्वभौमत्वासाठीचा त्यांच्या समर्पणाचा पुरावा आहे. अशा या लोहपुरुषाचे *१५ डिसेंबर १९५०* रोजी निधन झाले. लोकशाही मूल्यांवरील विश्वासाने एक मजबूत आणि चैतन्यशील भारतीय प्रजासत्ताकाचा पाया घातला. त्यांचे नेतृत्व हे नम्रता व निस्वार्थतेने चिन्हांकित होते. देशहितासाठी त्यांची वचनबद्धता व त्यागाची पातळी ही एक दुर्मिळ गुणवत्ता आहे जी नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहील. अशा या थोर महापुरुषाला कोटी कोटी प्रणाम…
सौ. ज्योती उकिर्डे, वैदेही शाखा कराड.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र