चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो
कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा उत्सव असतो. घटाची स्थापना,नंदादीप,मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे(एकभुक्त),शिवलिंगाचे दर्शन घेणे,ब्राह्मण-सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे केले जाते.
चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.खंडोबाची तळी भरून आरती करतात
सौ आरती पेंढारकर , वैदेही शाखा कराड
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र