▪️ महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे . येथे वीर माता जन्माला आल्या. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले . त्यांच्याच दुसऱ्या पिढीत स्वराज्याच्या मदतीस धावून आली भोसले घराण्याची सून आणि हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराराणी.
▪️शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजांनी नऊ वर्षे सतत युद्ध करून स्वराज्य टिकवले . त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शाहू महाराज मुगलांच्या कैदेत गेले . राजाराम महाराजांना जिंजीवर जावे लागले. राजाराम महाराजांनी जिंजी वरून राज्यकारभार पाहिला. औरंगजेबाने जुल्फीकारखानाच्या मदतीने राजाराम महाराजांना पकडण्यासाठी १६९२ ला वेढा घातला .१६९७ ला महाराजांनी किल्ला सोडला आणि तो औरंगजेबाच्या ताब्यात गेला. त्यानंतर ३ मार्च 1700 रोजी सिंहगडावर राजाराम महाराजांचे निधन झाले.
▪️या सर्व घटनांच्या साक्षीदार महाराणी ताराबाई होत्या. हंबीरराव मोहिते या स्वराज्य घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सेनापतींच्या पोटी ताराबाईंचा जन्म झाला होता . ताराराणींना स्वराज्य व लष्कर यांविषयीचे बाळकडूच मिळाले होते. स्वराज्याची धुरा आता त्यांनी हातात घेतली.
▪️ताराराणीने चार वर्षाच्या आपल्या मुलाला (दुसरा शिवाजी) गादीवर बसवले आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्याने राज्य कारभार बघण्यास सुरुवात केली.
▪️ मुघलांशी दोन हात करताना ताराराणींनी आक्रमक भूमिका घेतली. मुत्सद्दी ,कर्तृत्ववान सरदार मोघलांच्या समोर उभे केले . संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यासारख्या शूर सरदारांच्या साथीने त्यांनी मुघलांना सळो कि पळो करून सोडले . गनिमी काव्याचा त्यांनी असा वापर केला की मुघलांना जळी स्थळी काष्टी पाषाणीने मराठेच दिसू लागले . सैन्याच्या पुढे होऊन त्या सैन्याचे मनोगत वाढवत. स्वराज्याचे रक्षण करणे हे जीवनध्येय त्यांनी मराठ्यांमध्ये रुजवले होते. घोडेस्वारी मध्ये अत्यंत निपुण असणारी ही ताराराणी मूळचीच बुद्धिमान व तडफदार होती. या युद्ध कौशल्य व बुद्धीच्या आधाराने त्यांनी सतराशे ते सतराशे सात या काळात दक्षिणेत तळ ठोकून असलेल्या औरंगजेबास नेस्तनाबूत केले.
▪️१७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात गेल्या. जिंकलेल्या भागातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करून त्यांनी स्वराज्यास आर्थिक दृष्ट्या बळकट केले.
▪️मराठी राज्याच्या अडचणीच्या काळात कोणतेही खंदे नेतृत्व पुढे नसताना या झुंजार ताराराणीने बलाढ्य मोगल औरंगजेबास नामोहरम केले. त्यांचे पुढे मराठ्यांची अशी दहशत निर्माण केली की कुठूनही येऊन हे आपला जीव घेतील ह्या भीतीतच मोगल सैन्य राहत असे .संभाजी महाराजांचा छळ ,राजाराम महाराजांची फरपट , येसूबाई व शाहू महाराजांचे मोघलांच्या ताब्यात असणे. या सर्व गोष्टींचे शल्य हृदयात ठेवून ही रणरागिणी लढली .
▪️मराठ्यांच्या इतिहासाची ही सात वर्षे मोलाची ठरतात . या काळात ताराराणींनी राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली . समाजाचे नीती, धैर्य टिकवून त्यांनी खंबीर नेतृत्व दिले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाची कबर या भूमीतच खोदून तिने आपले कर्तुत्व सिद्ध केले.
▪️म्हणूनच कवी गोविंद म्हणतात –
दिल्ली झाली दीनवाणी ।
दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी।
भद्रकाली कोपली।
प्रलयाची वेळ आली।
मुगल हो सांभाळ।
▪️गीताग्रजा▪️
( डॉ. वैशाली काळे-गलांडे )
9420456918
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे