संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
▪️गावोगावी जाऊन, हातात झाडू घेऊन सर्व गाव स्वच्छ झाडून काढायचे, नंतर गाडग्याच्या खापरामध्ये पाणी व भिक्षा मागून खायची आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करायचे, हा संत गाडगे महाराजांचा वर्षानुवर्षे नित्यक्रम होता.
▪️”सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात” असे आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल म्हंटले आहे.
▪️संत गाडगेबाबांनी समाजात निर्माण झालेल्या अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा व अज्ञान यावर कीर्तनाच्या माध्यमातून आसूड ओढले. यांत अडकलेल्या सर्व सामान्य जनतेला जागृत करण्याचे काम केले.
▪️”गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनाचा गजर सर्वदूर पसरू लागला. लोक संत गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकायला गर्दी करू लागले. लहानपणापासून समाजाची परिस्थिती पहात आलेल्या व प्रत्यक्षपणे ही परिस्थिती स्वतः अनुभवलेल्या गाडगे महाराजांनी समाजाला, सावकाराचे कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, चोरी करू नका, स्पृश्य-अस्पृश्यता यासारखे भेदाभेद पाळू नका. देवाच्या नावाने निष्पाप प्राण्यांची हत्या करू नका असा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून दिला.
▪️अस्वच्छता त्यांना आवडत नसे. त्यामुळे प्रत्यक्ष झाडू हातात घेऊन त्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान राबविले. प्रामाणिकपणा व प्राणीमात्रांविषयी भूतदया यावर भर दिला. “देव दगड-धोंडयात नसून तो प्रत्यक्ष माणसात आहे,” ही शिकवण त्यांनी समाजाला दिली.
▪️गाडगे महाराज यांनी समाजप्रबोधनाबरोबरच विविधतीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा, नद्यांचे घाट, आश्रमशाळा, पाणपोयी, गोशाळा उभ्या केल्या,
सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा-महाविद्यालये काढली, अंध-अपंगांसाठी वसतिगृह बांधले. त्यांनी अशा अनेक संस्था उभ्या केल्या. या संस्थांमध्ये आपल्या कुटुंबातील एकाही सदस्याला सदस्य केले नाही.
▪️त्यांचे हे कार्य पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरही प्रभावित झाले. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात संत गाडगे महाराजांचा सल्ला घेतला व तो त्यांनी पुढे आमलात आणला.
▪️अशा या महान सामाजिक क्रांतिकारी लोकोत्तर संताचे कार्य आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांचे चरित्र प्रत्येकाने वाचलेच पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे.
संजय कीर्तने, नाशिक.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे