शरद पवार यांच्यापासून दूर जात राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेत सामील झाला होता. सत्तेत सामील झाल्या दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांच्या गटातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शक्य त्या मार्गाने बळ दिले जात आहे.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती, आता अजित पवार गटाने महाराष्ट्रभरातील आपल्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे ७० कार खरेदी करण्याचा निर्णय अंमलात आणताना दिसत आहे. या गाड्यांच्या किंमती १२ लाख ते २२ लाखापर्यंत असेल.दरम्यान, बुधवारी काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी पक्षाच्या मुख्यालयात नेण्यात आल्याच्या वृत्ताला अजित पवार गटाचे प्रमुख सुनील तटकरे यांनी दुजोरा दिला आहे.
अजित पवारांच्या पक्षात जवळपास ३६ जिल्हाप्रमुख आणि तेवढेच शहराध्यक्ष आहेत. पुढच्या टप्प्यात आघाडीच्या संघटनांचे नेतृत्व करणाऱ्यांना चारचाकी वाहने देखील मिळतील आणि एकूण गाड्यांची संख्या सुमारे ७० वर नेली जाईल अशी माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्याच्या ३६ जिल्ह्यांमधील सर्व जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना गाड्या दिल्या जातील असे सांगण्यात येत आहे.