विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सतत होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वर्षात सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पुन्हा एकदा भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली असून यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित आहेत .राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुर्नविकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकासकामे आणि कल्याण डोंबिवलीच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राज ठाकरे हे या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 2 डिसेंबरलाही ‘वर्षा’वर गेले होते. त्यावेळी राज्यातील टोल नाके आणि दुकानावरील मराठी पाट्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं.