रमण महर्षी यांचा जन्म मार्गशीर्ष वद्य द्वितीया या दिवशी झालाश्री शिवप्रभूने त्याचे भक्त गौतम व पतंजली यांना दर्शन दिले होते, त्यामुळे हा आरूद्रदर्शनाचा दिवस हिंदुस्थानात पवित्र मानतात. त्यांचे वडिल श्री सुंदरम् हे प्रख्यात वकील होते. त्यांच्या तीन मुलांपैकी मधला मुलगा म्हणजे व्यंकटरमण.
व्यंकटरमणाचे प्राथमिक शिक्षण तिरूचुझी येथे झाले. नंतर स्काॅटस् मिडल स्कूल व नंतर मदुराई येथील अमेरिकन मिशन स्कूलमधे शिकले. ते अभ्यासात फार हुशार नव्हते पण तब्येत सुदृढ होती. सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांना कुस्ती, पोहणे,फूटबॉल यांमधे जास्त आवड होती. मात्र एकदाच वाचलेले अथवा ऐकलेले तोंडपाठ होत असे. अचानक १८९५ नोव्हेंबर च्या सुमारास म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या जीवनात परिवर्तन घडले. एक वयस्कर व्यक्ती त्यांना भेटायला आली. ती व्यक्ती ‘ अरुणाचलम् ‘ येथून आली होती. हे ऐकून व्यंकट ला आदरयुक्त भीती आणि आनंद झाला. अरुणाचलम नाव ऐकताच वेगळा आनंद होणे हा प्रकार जुलै १८९६ पर्यंत सुरूच होता.
जुलै १८९६ मध्ये व्यंकट ला अचानक च मृत्यूचा अनुभव येतोय असं वाटून भीती वाटू लागली. दरदरून घाम आला. आपल्याला शरीर सोडावे लागणार असे वाटता च त्यांनी आपले हात पाय व शरीर कडक केले, श्वास रोखून धरला आणि तोंड देखील गच्च बंद केले.
पण त्यांना साधना न करताच, साधनेशिवाय अनुभव आला…. यावेळी त्यांनी स्वतःलाच विचारले. या शरिराबरोबर मी गेलो काय? की मी कुणी वेगळा आहे? तेव्हा आतून उत्तर मिळालं…. मी म्हणजे अमर आत्मा आहे. मृत्यू मुळे देहाचा अंत होईलही पण आत्मा हा अमरच आहे हे गीतेचे वचन आणि त्याचा साक्षात्कार त्यांना झाला व या अनुभवानंतर भौतिक जगतातील अनेक गोष्टींबाबत व्यंकटरमणांना उदासीनता आली.
ऑगस्ट १८९६ मध्ये शाळेची फी भरण्यासाठी भावाकडून मिळालेले पाच रुपये घेऊन ते घरातून निघाले आणि कधी वाहनाने तर कधी पायी असे मजल दर मजल करत ते तिरुवल्लामलाई येथे पोहोचले.
याठिकाणी त्यांनी पूर्वीच्या आयुष्याची सगळी चिन्हे टाकून दिली.
तेथे अरुणाचलेश्वर मंदिरात पोचले तेव्हा मंदिरात कोणीही पुजारी नव्हता. त्यांनी गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले. शांत बसले. तेथून ते बाहेर पडले, त्यांनी संन्यास घेतला नव्हता, त्यांना कोणीतरी विचारले की मुंडण करायचे का? त्यांनी संमती दिली. मुंडण केले, वस्त्रे टाकून दिली आणि फक्त लंगोटी टाकून संन्यस्त साधू झाले
संन्यासी झाल्यावर ते ध्यानाला बसू लागले तेव्हा मुले त्रास देऊ लागली. म्हणून ध्यानासाठी जागा शोधली त्या भूमिगत जागेला पाताळ लिंगम् म्हणतात. तेथे ते ध्यान करु लागले आणि ध्यानात ते इतके एकाग्र होत की बसल्यावर किडे चावले तरी त्यांना कळत नसे. हे इतरांना समजल्यानंतर त्यांची महती समजली आणि तेव्हापासून ते साधू ऋषी महर्षी म्हणून प्रसिद्ध झाले.
रमण महर्षी तिरुवल्लामलाई ला असल्याचे समजल्यावर त्यांच्या आई त्यांना घरी परत नेण्यासाठी तिथे आल्या. मात्र रमणजी यांनी मौनात आईंना मी परत येणार नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार घटना घडतात असं लिहून दिलं. आई परत गेल्या पण पुन्हा आपल्या दुसऱ्या मुलाला घेऊन त्या कायमच्या परत येऊन आश्रमात राहू लागल्या. आश्रमात अत्यंत सामान्य आयुष्य जगत स्वयंपाकाची जबाबदारी घेतली. भावाने देखील संन्यास घेतला.
कालांतराने आई आजारी पडल्यावर रमण महर्षीन्नी त्यांची सेवा केली. आईच्या मृत्युसमयी उजवा हात त्यांच्या छातीवर आणि डावा हात डोक्यावर ठेवत आईला मुक्ती प्रदान केली. आईच्या स्मृती प्रित्यर्थ मातृ मंदिर देखील बांधले.
रमण महर्षीना भेटायला अनेक साधक भेटायला येत व प्रश्न विचारत. या प्रश्नांची उत्तरे महर्षी वाणीचे मौन स्वीकारून मात्र लिखित प्रकार देत.
अरूणाचलावर वसतीला असता त्यांना भेटण्यासाठी तिरूवन्नमलाईवरून एक शिवप्रकाश पिले नावाचे, तत्वज्ञानाचे व अध्यात्माचा अभ्यास करणारे शिष्य भेटायला आले. पहिल्याच भेटीत ते प्रभावित झाले. पण तेव्हा रमण महर्षी मौन पाळीत म्हणून त्यांचा संवाद न होता , आध्यात्मिक प्रश्नोत्तरे लिहून ठेवली गेली.
‘मी’ कोण? , मोक्ष कसा प्राप्त होतो? पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंचप्राण यांचा काय संबंध? आणि हे सर्व मी नाही तर, खरा ‘मी’ कोण? हे व असे अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे लिहिलेली आहेत. हे सर्व टाकून दिल्यावर जे शिल्लक राहते ती जाणीव खरी “मी” आहे. अशी अनेक प्रश्नोत्तरे आहेत.
अशा प्रश्नोत्तरांचे’ who i am ‘ नावाचे पुस्तक तयार झाले. तसेच गीतेतील ४२ ओव्या निवडून त्याचे गीतासार नावाचे पुस्तक झाले, ते साधकांना खूप उपयुक्त आहे.
शेवटी शरीरधारी गुरूला शरणागती देणे म्हणजे आपल्या ह्रदयस्थ असलेल्या आत्मस्वरूपी गुरूलाच शरणागती होय,असे निक्षून सांगितले आहे.
शेवटी रमण महर्षींना कर्करोग झाला. त्यांनी शल्यविशारदांना सांगितले,मी देहापासून वेगळा आहे,त्यामुळे कोणताही अवयव काढायचा नाही, त्यांनी 1950 साली देह ठेवला.पण ते आपल्या आध्यात्मिक कतृत्वाने अजरामर आहेत. त्यांना माझे शतशः वंदन
– जयश्री आवले. मैत्रेयी शाखा ,कराड
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र