बहुप्रतिक्षित राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर पार पडला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळात २२ आमदारांनी मंत्री म्हणून आज शपथ घेतली. यामध्ये १२ कॅबिनेट तर १० राज्यमंत्री आहेत.
पंधरा डिसेंबर रोजी भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री म्हणून तर दीयाकुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.राजभवन येथे शनिवारी आयोजित सोहळ्यात राज्यपाल कलराज मिश्र यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली.
राजस्थानच्या भजनलाल शर्मा यांच्या नव्या मंत्रिमंडळात किरोडीलाल मीना, मदन दिलावर, राज्यवर्धन सिंह राठोड, गजेंद्र सिंह खिंवसर, बाबूलाल खराडी, जोगाराम पटेल, सुरेश सिंह रावत, अविनाश गेहलोत, जोराराम कुमावत, हेमंत मीना, कन्हैयालाल चौधरी, सुमीत गोदारा यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर श्रीकरणपूरचे भाजपचे उमेदवार सुरेंद्रलाल टीटी हे आमदार होण्यापूर्वीच मंत्री झाले आहेत. तसेच ओटाराम देवासी, मंजू बाघमार, विजय सिंह चौधरी, केके विश्नोई, जवाहर सिंह बेढम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. संजय शर्मा, गौतम कुमार, झाबर सिंह खुर्रा, सुरेंद्र पाल सिंह आणि हीरालाल नागर यांनीही राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.