१ जानेवारी आता एका आठवड्यावर आलाय. अनेकांना ह्याच दिवशी सुमारे २०० वर्षांपूर्वी झालेल्या एक छोट्याश्या लढाईची आठवण अगदी न चुकता येते – ती म्हणजे भीमा कोरेगावची लढाई. ही लढाई जरी दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात झाली असली तरी पेशव्याच्या सैन्याप्रमाणे कंपनीच्या सैन्यातही अनेक जाती-धर्मांचे लोक होते. पण तरीही ह्या लढाईचा विषय निघाला की काही लोक ‘कोणी’ ‘कोणाचे’ किती मारले वगैरे घटना आणि आकडे वाट्टेल तसे फुगवून सांगतात. पुराव्याचा वगैरे संबंध नाहीच. कागदपत्रांच्या आधारे बोलायचं झालं तर आपल्याकडे ह्या लढाईबद्दलचे उपलब्ध असलेले सगळे कागद पेशवे दप्तरातले – मग ते खरे आहेत का आणि कसे असतील वगैरे बिनबुडाचे आरोप होतात. अभ्यासक उत्तरे देऊन कंटाळून जातात पण अनैतिहासिक प्रश्न थांबतच नाहीत. त्यामुळे ह्या वर्षी भीमा कोरेगाव लढाईच्या प्रकरणावर ब्रिटिश लायब्ररीच्या कागदपत्रांच्या आधारे एका वेगळ्या कोनातून उजेड टाकायचा हा एक उपक्रम ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा समूह हाती घेतोय. येथे ३१ डिसेंबरपर्यंत दररोज ब्रिटिश लायब्ररीतली ह्यापूर्वी अप्रकाशित कागदपत्रे मांडली जातील. त्यांवर सर्व बाजूंनी आणि सर्व उपलब्ध साधने वापरून ससंदर्भ साधकबाधक चर्चा होणे हे अपेक्षित आहे.
आजच्या ह्या पहिल्या भागात ही लढाई नेमकी कुठे झाली आणि दोन्ही सैन्यं कोणत्या प्रकारे एकमेकांसमोर ठाकलेली होती हे बघूया.
भीमा कोरेगाव हे पुण्यातल्या शिरूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव. गावाच्या दक्षिणेकडून भीमा नदी वाहते. गावाच्या ईशान्येला शिरूरकडून येणारा रस्ता होता तर भीमा नदी ओलांडून नैऋत्येकडे पुण्याकडे जाणारा रस्ता होता. दुसरे बाजीराव पेशवे आपल्या सैन्यासह इंग्रजी फौजांना हुलकावण्या देत आणि गनिमी काव्याचा उत्तम प्रकारे वापर करत, इंग्रजांना दमवून पुढे जात होते. खुद्द बाजीरावांच्या फौजेतील अगदी खासे सोडल्यास कोणालाही आपण कुठे जात आहोत याची खबर नसे. एखाद्या गावात ते उतरल्या नंतर मुद्दाम वेगळ्याच वाटांची चौकशी करत आणि जात मात्र वेगळ्याच वाटेने, जेणेकरून नंतर इंग्रज गावातल्या लोकांना पेशवे कुठे गेले विचारत आणि वेगळ्याच मार्गाने जात. दि. ३० डिसेंबर रोजी बाजीराव आणि छत्रपती महाराज संगमनेरकडून, ब्राह्मणवाड्याचा घाट उतरून चाकणला येऊन दाखल झाले. पुण्यातल्या लोकांमध्ये अशी हूल उठली की बाजीराव पुन्हा पुणे जिंकणार. अगदी १७३८ शकातील हकीकतीतही याचे उल्लेख आपल्याला सापडतात. बाजीराव इंग्रजांना झुकांड्या देत फिरून पुन्हा पुण्याच्या अगदी जवळ आले आणि तरीही स्मिथ त्यांना पकडू शकला नाही हे बाजीरावांच्या गनिमी काव्याचं यश आणि स्मिथचे अपयशच म्हणावे लागेल. पुण्याच्या बंदोबस्तासाठी असलेला कर्नल बर नावाचा इंग्रज अधिकारी या वार्तेने धास्तावला. स्मिथ बाजीरावांना पकडू शकला नाही आणि आता बाजीराव जवळ आले या धास्तीने त्याने शिरूरला असलेल्या कॅप्टन स्टॉन्टन या अधिकाऱ्याला मदतीला पाचारण केले. मराठ्यांच्या फौजेचा नक्की अंदाज बांधता येत नाही, पण सुमारे वीस हजार घोडेस्वार आणि आठ हजार पायदळ यावेळी बाजीरावांकडे असावे असे दिसते. बाजीरावांनी पुन्हा एकदा पुणे जिंकण्याची हूल उठली असतानाच ते स्वतः मात्र साताऱ्याच्या रोखाने निघाले होते.
३१ डिसेंबर १८१७ च्या रात्री ८ वाजता बॉम्बे नेटीव्ह आर्मीची एक बटालियन (सुमारे हजार सैनिक), मद्रास आर्टिलरीच्या दोन ६ पाउंडर तोफा व त्यावरील अधिकारी, आणि २५० घोडेस्वार घेऊन कॅप्टन स्टॉन्टन शिरूरकडून पुण्याकडे निघाला होता. रात्रभर प्रवास करून १ जानेवारी १८१८ रोजी हे सगळे कोरेगावपासून दोन मैलांवर पोहोचले होते तेव्हा त्यांना अचानक नदीपलीकडील पेशव्याचे सैन्य दिसले. पेशव्याचे सैन्य फुलशहराकडून येत होते. त्यांच्या सैन्यात खुद्द दुसरा बाजीराव पेशवा, बापू गोखले आणि त्रिंबकजी डेंगळेंसारखी मातब्बर मंडळी तसेच सुमारे २०००० घोडेस्वार, आठ हजार पायदळ आणि दोन तोफा होत्या. ह्याचबरोबर अरब पालटणीही होत्या. इतक्या मोठ्या सैन्याशी खुल्या मैदानात निभाव लागू शकत नसल्याने गडबडीतच स्टॉन्टन त्याचे सैन्य कोरेगावात न्यायच्या ऑर्डर्स दिल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत स्टँटनचे सैन्य गावात गेलेले होते. पण गावाच्या आजूबाजूला बघतात तो काय – पेशव्याच्या घोडेस्वारांनी संपूर्ण गाव घेरलेले होते. शिरूरला जायचा रस्ता आणि पुण्याला जायचा रस्ता संपूर्णपणे बंद केलेला होता. नदीपलीकडून पेशव्याची एक मोठी तोफ कोरेगावावर रोखलेली होती. हे कमी की काय म्हणून पेशव्याच्या सैन्यातले सुमारे २००० अरब कोरेगाव गावात घुसले होते आणि त्यांनी कापाकापी सुरु केलेली होती. आणि खुद्द दुसऱ्या बाजीराव पेशव्याची छावणी पश्चिमेस पडलेली होती.
स्टॉन्टनचे संपूर्ण सैन्य कोरेगावात अडकलेले आणि सभोवती पेशव्याच्या सैन्याचा वेढा पडलेला. जवळून भीमा नदी वाहते आहे पण प्यायला पाणी नाही. १ जानेवारीच्याच दिवशी पुढे काय काय घटना घडल्या? इंग्रजांचा ह्या लढाईत खरंच विजय झाला का? किती आणि कोण लोक मेले त्यांचे? ह्या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात पुढच्या भागांत.
नकाशा स्रोत: ‘Sketch of the column at Corygaum, with a plan of the village, some letters private and public, the general orders and the despatch relating to the action on the 1st January, 1818’ – by John Wylie [1839]
British Library Shelf-mark: 10057.pp.10
टीप – सदर माहिती इतिहासाबद्दल आहे .कोणीही कोणत्या जातीला धर्माला शिव्या देऊन अपशब्द बोलू नयेत. तात्काळ कमेंट उडवण्यात येईल.
**सर्व सभासदांना अत्यंत महत्वाची सूचना**
आधीच हा विषय मुद्दाम जातीय बनवला गेल्याने संवेदनशील बनलेला आहे. आणि तीच चुकीची मानसिकता बदलण्यासाठी आपण हे करत आहोत. चुकूनही कोणी एकही जातीय कमेंट करु नये. हा लढा सरळ सरळ मराठे विरुद्ध इंग्रज असाच होता. यात कुठल्याही जातीचा संबध नाही. इंग्रजांच्या कूटनीती उघड पडण्याचा हा प्रयत्न असून आपल्याच माणसांविषयी अपमानास्पद लिहिण्याचा नाही हे लक्षात घ्यावे..
Vishal Ajay Khule
कोरेगाव भीमा , भाग_१, इतिहासाच्या_पाऊलखुणा
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे