मागच्या लेखात आपण १ जानेवारी १८१८च्या सकाळच्या घडामोडी बघितल्या. इंग्रजांचा किंवा मराठ्यांचा – कोणाचाही निश्चित विजय झालेला नव्हता. मराठ्यांना त्यांनी पेचात पकडलेल्या स्टॉन्टनच्या छोट्याश्या सैन्यावर विजय मिळवून काही फारसे साध्य होणार नव्हते कारण ह्या इंग्रज सैन्यात कोणी मोठा अधिकारी किंवा महत्त्वाचा माणूस नव्हता. मराठा सैन्यात बापू गोखले, त्रिंबकजी डेंगळे मंडळींबरोबर दुसरा बाजीराव पेशवा आणि प्रत्यक्ष सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज होते. ह्यांची छावणी नदीच्या दक्षिणेला होती. स्टॉन्टनला कोणतीही पुढची इंग्रजी कुमक यायच्या आत ह्या खाश्याना सुखरूप पुढच्या मुक्कामी पोहोचवणे हे मराठी सैन्याचे मुख्य ध्येय होते. त्यामुळे कोरेगावचा वेढा फारसा ताणण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते. १ जानेवारीच्या रात्री मराठी फौजा हळूहळू मागे फिरून पेशव्याच्या दिशेने जाण्याचा विचार करू लागल्या होत्या. या काळात नदीच्या पलीकडे असणारा पेशवा स्वतः छत्रपतींसह तेथून निघून जाऊन राजेवाडीच्या मुक्कामावर गेला होता.
इंग्रज सैन्याचे भरपूर नुकसान झालेले होते. जरी दोन्ही तोफा ताब्यात असल्या तरी मद्रास आर्टिलरीमधले जवळपास सगळे सैनिक आणि अधिकारी मारले गेलेले किंवा जायबंदी झालेले होते. सैन्याला ४८ तास अन्न किंवा पाणी मिळालेले नव्हते पण तरीही ते स्टॉन्टनच्या निर्णयानुसार शरण न जाता त्याच्यावर विश्वास ठेऊन तसेच थांबलेले होते कारण स्टॉन्टनला आशा होती की कर्नल स्मिथ किंवा कर्नल बरची मदत लवकर येईल. स्मिथ आणि बर हे दोघेही त्यांच्या सैन्यांच्या तुकड्या घेऊन पेशव्याच्या मागावर निघालेले होते त्यामुळे पेशव्याचा माग काढत ते कोरेगावाजवळ येतील ही स्टॉन्टनची अटकळ अगदीच चुकीची नव्हती असे नक्कीच म्हणता येते. पण हे असले तरी स्टॉन्टनला वस्तुस्थितीची व्यवस्थित जाणीव होती. २ जानेवारीला मराठा सैन्याने पुन्हा जर जोमाने हल्ला केला तर आपण खचितच वाचणार नाही हे त्याला पूर्णपणे ठाऊक होते. १ जानेवारीलाच त्याने कोरेगाव मुक्कामाहून रात्री ८ वाजता कर्नल स्मिथला एक पत्र पाठवले. त्यात तो लिहितो – “We are completely surrounded by the Peishwa’s Army, and cannot defend ourselves longer than tonight. We have lost many men and officers, send us aid, or we are all cut up tomorrow” (म्हणजे “आम्ही पेशव्याच्या सैन्याने संपूर्ण घेरले गेलेलो आहोत आणि आज रात्रीपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आमचे बरेच शिपाई आणि अधिकारी मारलेले गेलेले आहेत. आम्हाला [लवकर] मदत पाठवा नाहीतर हे उद्या आम्हालाही कापून टाकतील”) हे पत्र स्मिथने मुंबईचा गव्हर्नर सर इव्हान नेपिअन ह्याला पाठवलं. ब्रिटिश लायब्ररीत सर इव्हान नेपिअनच्या पत्रव्यवहारांत हे पत्र आजही जपून ठेवलेलं आहे.
म्हणजे आता परिस्थिती पहा. मराठे सहज स्टॉन्टनच्या सैन्याची कत्तल करू शकत होते पण त्यांना ते करण्यात काही स्वारस्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते पेशवा आणि सातारकर छत्रपतींची सुरक्षा. स्टॉन्टनला डळमळीत आशा होती की त्याला मदत येईल पण नक्की माहीत नव्हते. २ जानेवारी उजाडला.
२ जानेवारीच्या दिवशीच राजेवाडी मुक्कामाला असलेल्या मराठी फौजा साताऱ्याच्या रोखाने कूच करून पुढे गेल्या होत्या. मागून येणाऱ्या गोखले-रास्ते-देसाईंच्या तुकड्याही मुख्य फौजेला जाऊन मिळाल्या.
स्टॉन्टनने २ तारखेला काय काय केलं ते त्याच्याच शब्दात पाहूया. हे पत्र स्टॉन्टनने त्याचा शिरूरमधला कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल फिट्झसायमन ह्याला ३ जानेवारी १८१८ रोजी लिहिलेले आहे. ह्यात २ जानेवारीबद्दल स्टॉन्टन लिहितो “…At day break on the morning of the 2nd we took possession of the post the enemy had occupied the day before, but they did not attempt to molest us. On the evening of the 2nd despairing of being able to make my way good to Poonah, and my men having been 48 hours without food, and no prospect of procuring any in the deserted village we had taken post in, I determined upon the attempt to retreat; and having collected the whole of the wounded, secured the two Guns and one Tumbril for moving, I commenced my retreat at 7 PM being under the necessity of destroying one empty Tubril, and leaving the camp equipage; under under this explanation I trust I shall be justified in the steps, I have taken…” (म्हणजे “..२ जानेवारीला सकाळी शत्रूंने (मराठ्यांनी) काबीज केलेल्या जागा आम्ही हस्तगत केल्या पण त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. २ जानेवारीच्या संध्याकाळी आमचा पुण्याला जायचा मार्ग मोकळा झाला होता पण गेले ४८ तास तयार अन्न पाणी न मिळाल्याने आणि पुढे कुठे त्याची सोय होणार नसल्याने मी (पुण्याला न जाता पुन्हा शिरूरला) माघारी वळण्याचा निर्णय घेतला. सगळ्या जखमी शिपायांना, दोन्ही तोफांना, आणि एक सामानगाडी घेऊन संध्याकाळी ७ वाजता आम्ही (शिरूरकडे) परतीचा प्रवास सुरु केला. एक रिकामी सामानगाडीची आम्ही (कोरेगावात) विल्हेवाट लावली आणि काही तंबू वगैरेचे सामानही तिथेच सोडून दिले. ह्या वर्णनावरून मी घेतलेल्या निर्णयांची तुम्हाला कल्पना येऊ शकते…”.
म्हणजे २ जानेवारीला कोणतीही विशेष लढाई न करता स्टॉन्टनचे इंग्रजी सैन्य आले तिथून शिरूरकडे निघून गेले. मराठ्यांचे सैन्य पुण्याकडे न वळता साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. स्टॉन्टनला कोणाचीही मदत आली नाही पण मराठा सैन्य निघून गेल्याने तो बचावला. स्टॉन्टनचा कोणत्याही प्रकारे जय झाला नाही किंवा मराठ्यांचा पराजय झाला नाही कारण तसे झाले असते तर पेशव्याला आणि सातारकर प्रतापसिंह छत्रपतींना पकडायला स्टॉन्टन त्यांच्या मागावर गेला असता पण तसे काहीच झाले नाही. उलट पुण्याची कुमक करायला निघालेला स्टॉन्टन आल्या वाटेने पुन्हा शिरूरला निघून गेला.
पण हे सगळं झालं तरी काही प्रश्न उरतातच – मग कोरेगावात तो स्तंभ का उभारला आहे? त्याच्या मागची इंग्रजांची मानसिकता काय होती? कोरेगावची लढाई इतकी महत्त्वाची का होती? एल्फिन्स्टन वगैरे लोकांचे कोरेगाव लढाईबद्दल काय मत होते? हे आणि ह्यासारख्या अजून प्रश्नांची उत्तरे पाहूया पुढच्या भागांत.
संदर्भ:
सर इव्हान नेपिअन पेपर्स (ब्रिटिश लायब्ररी कॅटलॉग Mss Eur D666: 1812-1820)
‘Sketch of the column at Corygaum, with a plan of the village, some letters private and public, the general orders and the despatch relating to the action on the 1st January, 1818’ – by John Wylie [1839]
सर्वांसाठी अत्यंत महत्वाची सूचना:
आधीच हा विषय मुद्दाम जातीय बनवला गेल्याने संवेदनशील बनलेला आहे. आणि तीच चुकीची मानसिकता बदलण्यासाठी आपण हे करत आहोत. चुकूनही कोणी एकही जातीय कमेंट करु नये. हा लढा सरळ सरळ मराठे विरुद्ध इंग्रज असाच होता. यात कुठल्याही जातीचा संबध नाही. इंग्रजांच्या कूटनीती उघड पडण्याचा हा प्रयत्न असून आपल्याच माणसांविषयी अपमानास्पद लिहिण्याचा नाही हे लक्षात घ्यावे.
Sanket Kulkarni
भीमा_कोरेगाव, भाग_३ इतिहासाच्या_पाऊलखुणा
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे