मागच्या भागात आपण पाहिले की २ जानेवारीला कोणतीही विशेष लढाई न करता स्टॉन्टनचे इंग्रजी सैन्य आले तिथून शिरूरकडे निघून गेले. मराठ्यांचे सैन्य पुण्याकडे न वळता साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. स्टॉन्टनला कोणाचीही मदत आली नाही पण मराठा सैन्य निघून गेल्याने तो बचावला. स्टॉन्टनचा कोणत्याही प्रकारे जय झाला नाही किंवा मराठ्यांचा पराजय झाला नाही कारण तसे झाले असते तर पेशव्याला आणि सातारकर प्रतापसिंह छत्रपतींना पकडायला स्टॉन्टन त्यांच्या मागावर गेला असता पण तसे काहीच झाले नाही. उलट पुण्याची कुमक करायला निघालेला स्टॉन्टन आल्या वाटेने पुन्हा शिरूरला निघून गेला.
एलफिन्स्टन पुणे दरबारात कंपनीचा रेसिडंट होता. या पूर्वीच्या रेसिडेंट असलेल्या बॅरी क्लोजचा आणि पेशव्याचा बऱ्यापैकी सलोखा असल्याने इंग्रज ‘घुसखोरी’ करण्याइतकी मजल मारत नसत. पण इ.स. १८११ मध्ये क्लोजच्या जागी माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनची नेमणूक झाली आणि इंग्रजांच्या पुणे दरबारातील हालचाली पूर्णपणे बदलल्या. एल्फिन्स्टनने मराठ्यांचे पूर्ण राज्य गिळंकृत करण्याचा डाव रचला, आणि गंगाधरशास्त्र्याच्या खुनापासून याची सुरुवात झाली. शास्त्र्याच्या खुनाच्या आरोपात त्रिंबकजीला अडकवून त्याकरवी बाजीरावावर दबाव आणून एल्फिन्स्टनने युद्धाला सुरुवात करण्याचा मोठा डाव रचला. बाजीरावाचीही यावेळी युद्धाची तयारी सुरूच होती आणि अखेरीस ठिणगी पडली. कोरेगावची लढाई झाली तेव्हा एलफिन्स्टन चाकणच्या जवळपास होता. एलफिन्स्टन त्याची एक रोजनिशी लिहीत असे. ह्यात महत्त्वाच्या घटना अथवा लढाया ह्याच्याबद्दलचे त्याचे स्वतःचे विचार त्याने लिहिलेले आहेत. एलफिन्स्टनच्या सगळ्या डायऱ्या ब्रिटिश लायब्ररीत जपून ठेवलेल्या आहेत. ह्या कोरेगावच्या लढाईबद्दल एलफिन्स्टनचे काय मत होते ते पाहूयात.
३ जानेवारीला एलफिन्स्टन कोरेगावपासून साडेअठरा मैलांवर होता. ३ जानेवारीच्या त्याच्या जर्नलमध्ये ही नोंद आहे. एल्फिन्स्टन लिहितो:
“In consequence we marched at 3 for this place our impression at starting was the battalion was destroyed and that the Peishwa’s army was flushed with victory and aware of our small numbers was halted probably in some strong position to receive us. On the road the reports of the villagers made us more sanguine and at length a letter from Coats removed all doubt and relieved us from most of our anxieties. The battalion had taken post was hard pressed and lost 2 officers killed (poor young Wingate was one of them) and 3 or 4 wounded out of the 8. Most of the artillery men were killed with many of the sepoys when the whole were saved by the flight of the Peishwa, alarmed at the near approach of Gen Smith…”
(“आम्ही ३ वाजता इकडून (कोरेगावपासून १८.५ मैलांवरून कोरेगावला जायला) निघालो. आमची अटकळ अशी होती की (स्टॉन्टनच्या) बटालियनचा बीमोड झालेला असून पेशव्याचे विजयी सैन्य आमच्या छोट्याश्या सैन्याचा अंदाज येऊन कोणत्यातरी भक्कम परिस्थितीत आमच्याशी सामना करायच्या तयारीत थांबलेले असेल. वाटेत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला जरा हायसं वाटलं आणि कोट्सकडून आलेल्या पत्रामुळे आमच्या सर्व शंकांचे निरसन होऊन आम्ही चिंतामुक्त झालो. त्या बटालियनला खूप त्रास झाला आणि एकूण आठपैकी त्यांचे दोन अधिकारी मारले गेले (विंगेट त्यातला एक) आणि ३ ते ४ जायबंदी झालेत. तोफखान्यावरचे सगळ्यात जास्त शिपाई मारले गेलेत आणि बाकीचे स्मिथ येत आहे ह्या बातमीमुळे निघून गेलेल्या पेशव्यामुळे वाचलेत (नाहीतर तेही मारले गेले असते!) “)
एल्फिन्स्टन ६ जानेवारीला शिरूरला पोहोचला आणि तो स्वतः स्टॉन्टनला भेटला. त्याच्याशी कोरेगावच्या लढाईबद्दल बोलणे झाले. एल्फिन्स्टनने वर्णन करताना त्याच्या जर्नलमध्ये हे लिहिले आहे:
“… The Europeans talked of surrendering. The native officers behaved very ill and the men latterly could scarce be got even by kicks and blows to form small parties to defend themselves. They were under thirst fatigue and despondency….”
(“… युरोपिअन (सैनिक आणि अधिकारी) शरण जायची भाषा बोलत होते. नेटीव्ह ऑफिसर्स (भारतीय अधिकारी) अजिबात नीट वागत नव्हते (म्हणजे ऑर्डर्स न ऐकणे वगैरे) अन्नाचा इतका तुटवडा झाला होता की गोष्टी छोट्या छोट्या टोळ्या बनवून लाथा बुक्क्यांवर आलेल्या होत्या. तहान (भूक) आणि आलेला थकवा ह्याने ते खचून गेलेले होते…”)
ह्या जर्नल्समध्ये स्वतः एल्फिन्स्टन स्पष्ट लिहितोय की पेशव्याच्या ‘विजयी’ सैन्याशी सामना होईल अशी अटकळ होती किंवा स्मिथ येत आहे ह्या बातमीमुळे निघून गेलेल्या पेशव्यामुळे सैनिक जिवंत वाचलेत. किंवा स्टॉन्टनला भेटल्यानंतरच्या वर्णनात त्याच्या सैन्याच्या दारुण अवस्थेचीही कल्पना येते. मग इंग्रजांचा विजय झाला होता असा अपप्रचार कोणत्या जोरावर केला जातोय?
आणि तसे पाहता इंग्रजांनी मराठ्यांच्या फौजांचे येरवडा, खडकी, आणि अष्टी येथे दणदणीत पराभव केलेले होते. अष्टीच्या लढाईत प्रत्यक्ष बापू गोखले मारले गेलेले होते. मग ह्या सगळ्यापैकी कुठेही कोणताही ‘विजयस्तंभ’ न उभारता तो स्तंभ नेमका कोरेगावात उभारायची शिफारस कशी काय बरं केली असावी एल्फिन्स्टनने? नक्की काय लिहिले त्याने बंगालमध्यें गव्हर्नर जनरलच्या समितीला? किती खर्च आला होता हा स्तंभ बांधायला? काय होते त्याचे डिटेल्स?
पाहूया आपण पुढच्या भागात!
संदर्भ: Journal of Mountstuart Elphinstone
ब्रिटिश लायब्ररी (Mss Eur F88/363 : 28 Nov 1817-24 Sep 1820)
सर्वांसाठी अत्यंत महत्वाची सूचना:
आधीच हा विषय मुद्दाम जातीय बनवला गेल्याने संवेदनशील बनलेला आहे. आणि तीच चुकीची मानसिकता बदलण्यासाठी आपण हे करत आहोत. चुकूनही कोणी एकही जातीय कमेंट करु नये. हा लढा सरळ सरळ मराठे विरुद्ध इंग्रज असाच होता. यात कुठल्याही जातीचा संबध नाही. इंग्रजांच्या कूटनीती उघड पडण्याचा हा प्रयत्न असून आपल्याच माणसांविषयी अपमानास्पद लिहिण्याचा नाही हे लक्षात घ्यावे.
Umesh Mukund Joshi
#भीमा_कोरेगाव, भाग_४ ,इतिहासाच्या_पाऊलखुणा
सौजन्य- विश्व संवाद केंद्र,पुणे