मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर समाजाकडून होत असलेला विरोध यामुळे मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली असून, यासाठी 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यसरकार देखील वेगाने कामाला लागले आहेत. त्यानुसार मराठा आरक्षण प्रश्ना संबंधी मुंबई येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडणार असून, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना पत्र पाठवून या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे.मात्र मनोज जरांगे हे प्रत्यक्ष सहभागी न होता आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दुपारी 2 वाजता ही बैठक होणार असून यात मराठा आरक्षण विषयक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.आज पूर्ण दिवस ह्या बैठका चालणार आहेत. . त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्या जरांगे यांच्याकडून या बैठकीत मांडल्या जाण्याची शक्यता आहे.व्हिसीद्वारे मुख्यमंत्री जरांगे यांच्यात संवाद होणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले,आजच्या बैठकीला राज्यमंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.आज उपसमितीचीही बैठक आहे. राज्य मागासवर्गीयाचीही बैठक आहे. याबाबत अधिकृत पत्रकात उल्लेख नाही,परंतु सरकारकडून तसे सांगण्यात आले आहे.मराठा आरक्षणासंदर्भात आज चार मॅरेथॉन बैठका होणार आहेत.जनरल सॉलिसिटरपासून सचिव,महाराष्ट्रातील सर्व सचिव, मंत्री यात असणार आहेत.