महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते दादा भुसे हे पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्याचे नियोजन असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ जानेवारीपासून राज्यात मेळावे घेतले जातील, अशी माहिती अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी या वेळी दिली आहे.
शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनीही या वेळी आपली भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात अनेक चांगले निर्णय घेतले गेले. तसंच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत.जे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही जिल्हा पातळीवर मेळावे घेत आहोत. आगामी निवडणूक आम्ही एकत्र लढू, असे दादा भुसे यावेळी म्हणाले आहेत.
लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकू अशी आमची तयारी आहे. मोदींच्या नेतृत्वात आम्हाला यश मिळेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिषदेदरम्यान व्यक्त केला आहे. ४७ हजार ४१२ लोकांनी आमच्याशी संवाद साधताना मोदी हेच पंतप्रधान हवेत असे म्हंटले आहे.संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा आहे.असेही बावनकुळे यांनी सांगितले .
महायुतीकडून जानेवारीमध्ये जिल्हा आणि गाव पातळीवर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. फेब्रुवारीमध्ये विभागस्तरावर मेळावे होतील. फेब्रुवारीमधले मेळावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात होणार आहेत.