राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. २० जानेवारीपर्यंत आरक्षण न दिल्यास मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. या सर्व घडामोडींवर सरकारमधील आमदार बच्चू कडू यांनी एक विधान केले आहे. ”जो पर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही तोवर जरांगे पाटील यांनी तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहावे”, असे विधान केले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनामध्ये मी सहभागी होणार असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले आहेत.
कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण उपसमितीसह सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम आणि सर्व विभागीय आयुक्त देखील उपस्थित होते. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यानी मनोज जरांगे पाटील यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा केली. यामध्ये त्यांनी मराठवाड्यातील प्रत्येक गावात शंभर टक्के कुणबी नोंदींचे रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. तसेच राज्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना सांगितले.