आज सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती आहे त्यांचा जन्म नायगाव,सातारा येथे माळी परिवारात झाला होता. अवघ्या नव्या वर्षी त्यांचे लग्न क्रांतिवीर ज्योतीराव फुले यांच्याशी झाले. ज्योतिराव फुले हे शिक्षणाचे पुरस्कर्ते होते.
एकदा जेव्हा ज्योतिबा फुले हे सायकल वरून शिक्षणासाठी मुलं गोळा करत होते तेंव्हा, एक इंग्रज स्त्री अधिकारी त्यांना म्हणाली तुम्ही घरच्या बायकांना घराबाहेर काढत नाही,शिकवत नाही आणि बाहेरचा समाज काय तुम्ही सुधारणार आणि काय शिकवणार! एक स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकेल . ज्योतिबाना हे पटले . ज्योतिबा फुले घरी आले आणि सावित्रीबाईंचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला
सावित्रीबाईं मुळात जिज्ञासू वृत्तीच्या होत्या. नवऱ्याच्या खंबीर पाठिंबामुळे त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. त्यावेळी लोक म्हणत बायका शिकल्या की नवरा मरतो, बायका शिकल्या तर ,अक्षरे अळ्या बनून तटात पडतात. त्यांनी समाजाला दाखवून दिलं की ही एक अंधश्रद्धा आहे. अशा अनेक चुकीच्या अंधश्रद्धा, रूढी परंपरा,सती प्रथा, केशपतन यांच्याविरुद्ध सावित्रीबाईंनी बंड पुकारले होते. पुढे त्या स्वतः ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षिका झाल्या. १८४८ चा काळ.. एक जानेवारीला भिडे वाड्यात येताना त्यांचा भयंकर छळ झाला, कुणी दगड फेकून मारले, कोणी शिव्या शाप दिले कोणी बोटे मोडली कोणीही बादलीभर पाणी त्यांच्या अंगावर ओतले.. पण त्या पुढे भिडे वाड्याकडे चालत राहिल्या.. वाड्यात पोहोचल्या आणि पाटी पेन्सिल देऊन मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली.. अशी मुलींची ती पहिली शाळा भिडे वाड्यात एक जानेवारी १८४८ला सुरू झाली. पन्नास वर्षे त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले.
फक्त शिक्षण क्षेत्रात काम केलं असं नव्हे तर, १८५७ ला पुण्यामध्ये भयंकर प्लेगची साथ होती रोज सातशे आठशे लोक प्लेग मुळे मरत होते, त्यावेळी न डगमगता न घाबरता, त्या घराच्या बाहेर पडल्या आणि धडाडीने पुढे होऊन त्यांनी आजूबाजूच्या लोकांची मदत केली. एका मुलाला तर खांद्यावर घेऊन दहा किलोमीटर चालत आल्या, त्याच्यावर उपचार केले आणि त्या मुलाचा जीव वाचवला.
त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला त्याला शिकवलं वाढवलं. मुलाचे नाव ठेवले यशवंत. तो डॉक्टर झाला डॉक्टर होऊन त्यांनी समाजासाठी, समाज कल्याणसाठी हॉस्पिटल काढले.
गोरगरिबांसाठी सावित्रीबाईंनी सर्वांगीण विकासासाठी खूपच काम केले. १०मार्च १८९७ ला त्यांचा मृत्यू झाला. सावित्रीबाईंची जयंती ही ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरी साजरी करतात. अशा ह्या क्रांती ज्योतीला त्रिवार प्रणाम..
सौ.मोना अजिंक्य बडवे, रुक्मीणी शाखा
लष्कर भाग, हडपसर
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत