अयोध्येत राममंदिर झाले आहे. भव्य-दिव्य आणि सुंदर देखील झाले आहे. पण आता भविष्यात काय? हे समाज मंदिर भविष्यासाठी हिंदू समाजाकडून काही अपेक्षा करीत आहे का? काही संकेत देत आहे का? देत असेल तर ते कोणते? हे आपण पहात आहोत. मंदिर सुंदर झाले आहे. म्हणजे बांधकाम मजबूत आहे, मूर्ती मनात पवित्रभाव निर्माण करणाऱ्या आहेत, परिसर नयनरम्य आहे, सुख-सुविधा कल्पना केली नव्हती अशा आहेत, रेल्वेस्थानक विमानतळ वाटावे असे आहे, विमानतळ जागतिक दर्जाचे आहे, हे सर्व तर आहेच. पण ज्या हिंदू समाजाने रामलल्लाची आज्ञा शिरसावंद्य मानून हे सुंदर शिल्प उभारले आहे, त्यानेही सुंदर दिसावं व असावं, हा संकेतही हे राम जन्मस्थळ देत आहे. कसे? ते पाहू या.
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणामुळे जे सामाजिकरण झाले त्यात संपूर्ण देशाने सहभाग दिला. सर्व भौगोलिक क्षेत्राने दिला, सर्व समाजाने दिला. निरपवादपणे सर्व समाजाने दिला व येथूनच रामलल्ला आपल्याला भविष्यातील सामाजिक आचरणासंदर्भात संकेत देत आहेत. अयोध्या आंदोलन संपूर्ण समाजाचे होते म्हणजे जातीपातीच्या सीमा पुसून टाकून ‘हिंदू सारा एक’ या उद्घोषाचे होते.
त्या अयोध्या रणाच्या सामाजिक जाणीवांच्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या, मोहरून टाकणाऱ्या होत्या. दीर्घ काळाच्या, घट्ट मूळ धरून बसलेल्या कुरितींना दूर करण्यासाठी समाज सुधारकही अपुरे पडले होते. कुरितींना फक्त कुरवाळणे नव्हते तर अभिमानाने मिरवणे पण होते. अशा कुरिती दूर करण्यासाठी भगवान श्रीराम यांनी शेवटी स्वतःलाच कारण बनवले असे वाटते. कारण त्या अयोध्या रणाने या कुरितींच्या भिंती कडाडून कोसळवून दाखवल्या होत्या.
कोण, कुणाचे कोण, पण एकच जात राहिली होती रामनामाची. ठाकुरांच्या गढीवर केरळातील दलित बांधव डाळ-रोटी खात होता, एखादा उद्योगपती झोपडीत लवंडलेला दिसत होता. पण कोणताच भेद कुणाला स्मरतही नव्हता. जात नाही, रामकाज हीच ओळख बनली होती. हिंदुत्वाच्या भावनेने सर्व भेदांवर मात केली होती. सुंदर एकात्म समाजाचे दर्शन त्यावेळी सर्व जग घेत होते. ही सामाजिक सुंदरता तात्कालिक न ठरता कायमस्वरुपी वज्रलेपी ठरली पाहिजे, हा भविष्यासाठीचा संकेत हे मंदिर देत आहे.
प्रभू रामचंद्रांचे निषादांशी असलेले संबंध, वनवासी सुग्रीवाशी असलेले आत्मीयभाव व तत्सम सामाजिक व्यवहार हेच रणकाळातील आदर्श होते. पण असे दिवस, त्या भावना फक्त आंदोलनापुरत्या म्हणून चालत नाहीत तर कायमस्वरूपी असाव्या लागतात.
म्हणून हे मंदिर हिंदू समाजाला जाणीव करून देत आहे की, ही एकात्म समतेची भावनाच देशाची शक्ती आहे, ती भावना प्रयत्नपूर्वक सांभाळावी लागते आणि वाढवावी लागते. समाजातील एकात्मता वाढेल, दुराव्याचे विषय मागे पडतील, विस्मरणात जातील हे पहावेच लागेल. मोठी ध्येये समोर ठेवावी लागतील, कुरितीच्या छोट्या रेषा हिंदुत्वाच्या मोठ्या रेषेने पुसाव्या लागतील व हे काम एखादा समाज सुधारक नाही तर संपूर्ण समाजाने सतत करावे लागेल तरच सुंदर समाज बनेल व टिकेल.
हे सुंदर मंदिर, सुंदर समाज बनवण्याचे आवाहन करीत आहे. समाज म्हणून आपल्याला सुंदर मंदिराकडून भविष्यासाठी हाच संकेत आहे. आपण तो अंमलात आणू या!
असे कोणकोणते संकेत हे राम मंदिर देत आहे, ते पुढील लेखात समजून घेऊ यात.
#राममंदिर #राष्ट्रमंदिर
– सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे