पाटणा | बिहारमधील छपरा जिल्ह्यातील गायिका स्वाती मिश्रा या सध्या चांगल्याच चर्चेत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी त्यांनी गायलेले ‘राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी…’ हे भजन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याचे अनेक रीलही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर आता हे भजन ऐकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वाती मिश्रांचे फॅन झाले आहेत. त्यांनी स्वातींचं कौतुकही केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर स्वाती यांनी गायलेल्या भजनाचा व्हिडीओ शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. श्री रामलाला यांच्या स्वागतासाठी स्वाती मिश्रा जी यांचे हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तर स्वाती यांनी गायलेल्या या भजनाला आतापर्यंत 42 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे स्वाती मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवरून लॉन्च करण्यात आले आहे.
स्वाती मिश्रा आधी इतक्या प्रसिद्ध नव्हत्या, पण त्यांनी गायलेल्या या भजानने त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांच्या भजनाने करोडो लोकांना वेड लावले आहे. तसंच सध्या त्यांचं हे भजन चांगलंच ट्रेंडमध्ये आहे. बरेच लोक इन्स्टाग्रामवर त्याचे लिरिक्स वापरून रील बनवत आहेत. याशिवाय स्वाती मिश्रांची आणखी बरीच गाणी व्हायरल झाली आहेत. नुकतेच 2 जानेवारी रोजी स्वाती मिश्रा यांचे ‘राम आये हैं’चे दुसरे गाणे त्यांच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झाले आहे. या गाण्याचे बोल स्वाती मिश्रा यांनी स्वतः लिहिले आहे.