त्रिशूर : आज दुपारी केरळमधील त्रिशूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. लक्षद्वीपमधील अगट्टी येथून विशेष विमानाने नेदुम्बसेरी येथे उतरलेले पंतप्रधान हेलिकॉप्टरने त्रिशूरच्या कुट्टनल्लूरला गेले जेथे त्यांच्या मोटार ताफ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथील लोकांनी पंतप्रधानांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन आणि अभिनेते-राजकीय नेते सुरेश गोपी पंतप्रधानांच्या ताफ्यात त्यांच्यासोबत होते.
पंतप्रधान मोदी भारतीय जनता पक्षाच्या नाईकनळ येथे होणाऱ्या महिला परिषदेला संबोधित करणार आहेत. ‘स्त्री शक्ती मोदीक्क ओप्पम’ (मोदींसोबत महिला सक्षमीकरण) शीर्षकाने आज थेक्किंकडू मैदानावर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षण विधेयक यशस्वीपणे मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन भाजपच्या केरळ युनिटने केले आहे.
काल पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपच्या कावरत्तीमध्ये 1,156 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. कावरत्तीमध्ये 1,156 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, लक्षद्वीपचे क्षेत्रफळ लहान असले तरी त्याचे हृदय मोठे आहे.
मला येथे मिळत असलेले प्रेम आणि आशीर्वाद पाहून मी भारावून गेलो आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. 2020 मध्ये, मी तुम्हाला हमी दिली की तुम्हाला पुढील 1000 दिवसांत जलद इंटरनेट सुविधा मिळेल. आज, कोची-लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फायबर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. आता, लक्षद्वीपमध्ये इंटरनेट 100 पट अधिक वेगाने उपलब्ध होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी कावरत्ती येथे प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर सांगितले.
स्वातंत्र्यानंतर केंद्रात अनेक दशके राहिलेल्या सरकारचे एकमेव प्राधान्य त्यांच्या राजकीय पक्षांच्या विकासाकडे होते. दूरची राज्ये, सीमावर्ती भाग किंवा समुद्राच्या मध्यभागी असलेल्या प्रदेशांकडे त्यांनी लक्ष दिले नाही. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने सीमावर्ती भाग आणि समुद्राच्या काठावरील क्षेत्रांना आपले प्राधान्य दिले आहे, असंही मोदींनी सांगितलं.
पुढे पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये भारत सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लक्षद्वीपमध्ये भारत सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना आनंद झाला. महिलांच्या एका गटाने त्यांच्या स्वयंसहायता गटाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी कसे कार्य केले, अशा प्रकारे स्वावलंबी बनले याबद्दल सांगितले. एका वृद्ध व्यक्तीने आयुष्मान भारतने हृदयाच्या आजारावर उपचार करण्यासाठी कशी मदत केली याबद्दल सांगितले. आणि PM-KISAN मुळे एका महिला शेतकर्याचे जीवन बदलले. इतरांनी मोफत रेशन, दिव्यांगांसाठीचे फायदे, PM-AWAS, किसान क्रेडिट कार्ड, उज्ज्वला योजना आणि बरेच काही याबद्दल सांगितले. विकासाची फळे मोठ्या प्रमाणावर पोहोचतात हे पाहून खरोखरच समाधान वाटते, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.