शिर्डी येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात भारतीय जनता पार्टी चांगली आक्रमक झालेली दिसून येत आहे. वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
पक्षाच्या शिबिरामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ”राम आमचा आहे. राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही सर्व जण आम्हाला शाकाहारी बनवायला जाता, मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो म्हणून आम्ही मटण खातो. हाच आहे रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता.१४ वर्षे जंगलात राहणार व्यक्ती शाकाहारी भोजन शोधायला कुठे जाणार?” असे वादग्रस्त विधान केले आहे.
यावर बोलताना राम कदम म्हणाले, ”आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे देशातील समस्त महंताना, साधू संतांच्या मनाला काय वाटले असेल? वारंवार हिंदू धर्माचा अपमान करायचा, हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवायची हे केवळ विशिष्ट समाजाची मते गोळा करण्यासाठीचे राजकारण आहे. त्यांच्या या विधानाबद्दल त्यांना अटक करावी.” आव्हाडांच्या वादग्रस्त विधानाविरोधात राज्यभरात भाजपा ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसून येत आहे.