काल शिर्डी येथील शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी असल्याचे वादग्रस्त विधान केलं होते. त्यानंतर राज्यभर भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटना राज्यभर आव्हाडांविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांच्या अटकेची मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. श्रीराम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड म्हणाले,”मी कोणतेही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही. तरी पण मी सांगतो आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्व मिळते. जर कालच्या माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.मला हा वाद वाढवायचा नाही.”
बुधवारी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिबिरामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांनी यांनी ”राम आमचा आहे. राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही सर्व जण आम्हाला शाकाहारी बनवायला जाता, मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो म्हणून आम्ही मटण खातो. हाच आहे रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता.१४ वर्षे जंगलात राहणार व्यक्ती शाकाहारी भोजन शोधायला कुठे जाणार?” असे वादग्रस्त विधान केले होते.