अयोध्यास्थित राममंदिर हे आता वास्तव बनले आहे. जन्मभूमीवरील मंदिर सुंदर बनले आहे, कणखर बनले आहे, ते भव्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशाप्रकारे उभे राहिलेले हे जगातील एकमेवाद्वितीय मंदिर आहे. त्याच्या वैशिष्ट्यांमुळे हे मंदिर, केवळ वास्तू न रहाता एक दिशादर्शक दीपस्तंभ बनला आहे. त्याच वैशिष्ट्यांचा विचार आपण करत आहोत. भविष्यात हिंदू समाजाकडून, भारतीयांकडून या मंदिराच्या अपेक्षा तरी काय आहेत? कोणते संकेत ते आपल्याला भविष्यासाठी देत आहे.
हे मंदिर दानातून, धनिकांच्या श्रध्देतून, राजाच्या मनगटातील पराक्रमातून उभे राहिलेले नाही. तर समाजाच्या इच्छाशक्तीमधून, समाजाच्या एकत्र कृतीतून, सामुहिक हुंकाराने उभे राहिले आहे. रामजन्मभूमीवरील मंदिरासाठी झालेल्या अंतिम आंदोलनाची योजना व कृती करणारे कोण होते. कोणते चेहरे होते?, कोणती नावे होती? कोणीच सांगू शकणार नाही, कारण ते कुणी धुरीण नव्हतेच. म्हणूनच नावही नव्हते व चेहराही नव्हता. पण हीच त्या आंदोलनाची ताकद होती व यशाची खात्री.
सामान्यपणे नेता दिशा देतो व अनुयायी पाठपुरावा करतात. मग देशाचा प्रश्न असेल तर सरकार, सामाजिक प्रश्न असेल तर समाज सुधारक असतात व असेच नेते वा चेहरे असतात. अयोध्या आंदोलनाने या पायऱ्या ओलांडून सर्वात उन्नत समाजाने स्वयंप्रेरणाच नेतृत्व कसे करते याचे पायंडे पाडले. एका व्यक्तीच्या इच्छेने नव्हे तर संपूर्ण समाजाने स्वयंस्वीकृत ध्येय म्हणून हे आंदोलन हाती घेतले ही भविष्यासाठी या मंदिराने दाखवलेली दिशा आहे.
अयोध्येत राममंदिर व्हावे म्हणून शीलापूजन करावे असे ठरले, गावात कार्यकर्ते नव्हते तरी गावाने शीलापूजन केले. गावोगाव विटा पाठवण्याची क्षमता नेतृत्वाची नव्हती पण त्याची गावांना क्षिती नव्हती. विटही गावची व पूजनही गावचे. कारसेवक नोंदणी वगैरे गणिती कारभार नव्हता, निमंत्रण, आमंत्रण, आवताण असे काहीच नव्हते. कार्यकर्ते पोहोचणार देखील नव्हते, पण जनता थांबली नव्हती, मंदिरासाठी एक कुदळ माझी देखील हाच भाव होता. म्हणून हा जनतेने केलेला जनोत्सव होता आणि म्हणून एवढे दीर्घकाळ चालूनही हे आंदोलन यशस्वी झाले, कारण जनता हा लढा कोणाच्या नेतृत्वाखाली लढली नाही तर स्वतः समाज स्वतःसाठीच लढला.
मंदिर हाच संकेत देत आहे. समाजाने स्वतःच स्वतःचे नेतृत्व करायचे आहे. कोणी मला माझी समस्या सांगण्याची गरज नाही, नेतृत्व करण्याची गरज नाही. तर, मी समाजपुरूष आहे आणि माझ्या रचना मीच निर्माण करीन. भारतीय समाजाने पूर्वी देखील केलेले आहे, मध्यंतरीच्या काळात ते विस्मरणात गेले होते. आपल्या आर्थिक, भावनिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक गरजांसाठी आम्ही स्वतःच नेतृत्व करत होतो, अयोध्या आंदोलनप्रमाणे! कधी कुटुंब रचनेच्या माध्यमातून आम्ही आपल्या भावनिक गरजा भागवत होतो, तर सामाजिक गरजांसाठी भावकी काम करत होती, शैक्षणिक गरजांसाठी ज्ञातीबांधव व कुटुंब पाठीशी उभे रहात होते, धार्मिक गरजांसाठी मठ-मंदिरे, साधु-संत यांचे पाठबळ होते, आर्थिक गरजांसाठी कुटुंब ही तर मायेची पाखर होती. कालपरत्वे स्वरूपांमध्ये बदल होत गेला असेल पण समाज स्वतःच ‘रक्षति स्म परस्परं ‘ अशी रचना निर्माण करून स्वतःच स्वतःचे नेतृत्व करत होता.
आणि म्हणूनच हजार वर्षांच्या आक्रमणांनंतर सुद्धा हा समाज पुनः पुन्हा उसळी मारून उभा राहिला. अयोध्या आंदोलनातही आपण याचा अनुभव घेतला.
जगाच्या पाठीवर हे एकमेव आंदोलन असेल ज्याला झगमगता नेता नव्हता, सरकारचे सहकार्य नव्हते, धनिकांचे पाठबळ नव्हते, मान्यताप्राप्त बुद्धिवाद्यांचे सहकार्य नव्हते, तरीही समाजाने स्वत्व जागवून स्वतःच नेतृत्व करून विजय मिळवून दाखवला.
आता राममंदिर याकडे लक्ष वेधत आहे की, हे समाजपुरूषा! तुझे स्वत्व परत कुणा सरकारकडे, राजाकडे, संस्थेकडे, गहाण टाकू नको. पूर्वीप्रमाणे तू जागृत रहा, तुझ्या व्यवस्था तूच निर्माण कर, तूच चालव, तू कालोचित रहा व जगाला मार्गदर्शन कर. जगाचा इतिहास सांगतो की राजसत्ता बुडाली की समाज-संस्कृती बुडते. फक्त भारत सांगतो किंवा हिंदू सांगतो, समाज स्व-निर्भर असेल तर राजे हरले, सरकारे हरली तरी समाज हार जात नाही व पुनः पुन्हा शुन्यातून नवजीवनाची उभारणी करतो.
अयोध्येतील राममंदिराच्या निमित्ताने समाजाने हे सिद्ध केले आहे, आता कायमस्वरूपी क्रियान्वयन करायचे आहे.
#राममंदिर #राष्ट्रमंदिर
– सुनील देशपांडे,९४२०४९५१३२
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे