राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले. श्रीराम हे मांसाहारी होते अशा प्रकारचे ते वादग्रस्त विधान होते. यावर मविआ मधील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर संजय राऊत, सुप्रिया सुळे तसेच उद्धव ठाकरे, काँग्रेस यांनी याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र आव्हाडांचे सहकारी आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर भाष्य केले आहे. त्या ट्विट बाबत प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर रोहित पवारांनी ”आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवारांच्या पोस्टबाबत आव्हाडांना विचारले असता, ”मी रोहित पवार काय बोलतात याला मी महत्व देत नाहीत. ते अजून लहान आहेत. त्यांची (आमदार) म्हणून ही पहिलीच टर्म आहे.” तसेच ”अबूधाबीत जाऊन बोलणे फार सोपे आहे” असा टोला देखील त्यांनी रोहित पवारांना लगावला आहे.