सध्या राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून लोकसभा व त्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्यासाठी मविआ आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच मविआमध्ये आता वंचित बहुजन आघाडी देखील सामील होऊ शकते अशी शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीबाबत एक विधान केले आहे. वंचित बहुजन आघाडीला आम्ही मविआचाच घटक समजतो असे ते म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले, ”वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झालेली आहे. ती युती असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यास कोणतीही हरकत नसल्यामुळे, आम्ही असे मानतो की, वंचित बहुजन आघाडी हा देखील महाविकास आघाडीचा एक घटक आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्याच सन्मानाने आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करत आहोत.”
२०२४ या वर्षांमध्ये देशात लोकसभा निवडणूक तर त्यापाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्वात आधी शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदारांचा गट बाहेर पडल्याने शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले आणि मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. काही कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार व त्यांच्या सहकारी आमदारांचा गट देखील बाहेर पडून सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला तसेच महायुतीला पराभूत करण्यासाठी मविआ आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.