बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरामध्ये बोलताना प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आव्हाडांच्या हा विधानानंतर राज्यभरात भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. खेद व्यक्त केला असला तरी त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. आव्हाडांच्या विधानावर आता गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री शंभूराज देसाई?
जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, ”जितेंद्र आव्हाड हे एक विधानसभा सदस्य आहेत. एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सध्या खूप जवळ आहेत. त्यांची सगळी वक्तव्ये तपासून त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी आता गुन्हे दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी धार्मिक पंथातल्या बाकीच्या काही लोकांनी येऊन तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे ती सगळी ऑडिओ, व्हिडीओ क्लिप तपासली पाहिजे, त्याची सत्यता पडताळली पाहिजे आणि नक्कीच त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हे माझे व्यक्तिगत मत आहे. मंत्री म्हणून वेगळे, पण व्यक्तिगत म्हणून माझे हे मत आहे, की जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक केली गेली पाहिजे.”
जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान काय ?
शिर्डी येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले. पक्षाच्या शिबिरामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ”राम आमचा आहे. राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही सर्व जण आम्हाला शाकाहारी बनवायला जाता, मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो म्हणून आम्ही मटण खातो. हाच आहे रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता.१४ वर्षे जंगलात राहणार व्यक्ती शाकाहारी भोजन शोधायला कुठे जाणार?” असे वादग्रस्त विधान केले होते.