गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात काही अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडली आहेत. सर्वात पहिल्यांदा शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेना कोणाची व आमदार अपात्रता याच्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र हे सगळे सुरु असतानाच अजित पवार व त्यांच्या सहकारी आमदारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडला आणि सत्तेत सामील झाला. आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी देखील होणार आहे. अखेर राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी वेळापत्रक तयार झाले आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी वेळापत्रक कसे असणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. तर २० आणि २१ जानेवारी रोजी अजित पवार गटांच्या आमदारांची उलट तपासणी होणार आहे. तसेच २२ आणि २३ जानेवारो रोजी शरद पवार गटांच्या आमदारांची उलट तपासणी होणार आहे. ज्या प्रमाणे ठाकरे गटाची शिवसेनेची उलट तपासणी झाली, त्याप्रमाणेच प्रश्न अजित पवार आणि शरद पवार गटाला विचारले जाणार आहेत. ६ जानेवारी म्हणजे उद्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये २० ते २३ हे दिवस महत्वाचे असणार आहेत.
यामध्ये ६ जानेवारी रोजी दोन्ही गटाच्या याचिका आणि त्यावरील उत्तरांची कागदपत्रे एकमेकांना सोपवली जाणार आहेत. तर ८ जानेवारीला याचिकेबाबतची अतिरिक्त माहिती जमा करण्याची वेळ देण्यात आली आहे. ९ जानेवारी रोजी फाईल्स किंवा अतिरिक्त कागदपत्रे पटलावर ठेवण्यात आली आहेत. ९ तारखेनंतर कोणतीही कागदपत्रे जोडता येणार नाहीत. ११ जानेवारीला याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी केली जाणार आहे. १४ तारखेला एखादे कागदपत्र वगळण्यासाठी तसेच सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच १८ जानेवारीला प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. २७ तारखेपर्यंत सुनावणी होणार असून २५ ते २७ दरम्यान अंतिम युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारीपर्यंत निकाल द्यायचा आहे, त्यासाठी असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तर अध्यक्षांना शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेचा निकाल १० जानेवारीपर्यंत द्यायचा आहे.