नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, संजय सिंह यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ 27 जानेवारीला संपत आहे. तसेच ‘आप’ने त्यांना पुन्हा राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकिकडे जामीनाबाबत न्यायालयाकडून सातत्याने धक्के दिले जात असतानाच दुसरीकडे संजय सिंह तुरुंगात असतानाच राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीतील एका न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांना राज्यसभेसाठी पुन्हा नामांकनासाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली आहे. त्याचवेळी, दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी संजय सिंह यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला ईडीने संजय सिंह यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून संजय सिंह यांना जामीन मिळालेला नाही.
निवडणूक आयोगाने 2 जानेवारीला नामांकनासाठी नोटीस जारी केली होती. तर 9 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. दरम्यान, संजय सिंह यांच्या अर्जावर तिहार तुरूंग अधीक्षकांकडे कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची परवानगी मागितली होती. तर कोर्टाने तुरूंग अधीक्षकांना संजय सिंगच्या वकिलांना 6 जानेवारीला कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, संजय सिंह यांना दिल्लीत राबवलेल्या मद्य धोरण प्रकरणात ईडीने 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. रद्द करण्यात आलेले अबकारी शुल्क धोरण राबवण्यात संजय सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच आर्थिक लाभाच्या बदल्यात काही घाऊक विक्रेते, मद्य व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांची मर्जी राखल्याचा आरोपही ईडीने केला आहे. मात्र, या सर्व आरोपांचं खंडण संजय सिंह यांनी केले आहे.