अत्यल्प निधी संकल्पनामुळे पक्षश्रेष्ठींचा झाला हिरमोड
काँग्रेस पक्षाने निधीची कमतरता दूर करण्यासाठी जनतेकडून निधी संकलन (क्राऊड- फंडिंग) करण्याची योजना आखली होती. यामाध्यमातून 2 आठवड्यात पक्षाला 11 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. परंतु, अपेक्षेहून अत्यल्प निधी मिळाल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा हिरमोड झाला असून कार्यकर्त्यांना निधीसाठी अधिक प्रयत्न करण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला निधीची कमतरता भासत आहे. यामुळे पक्षाने गेल्याच महिन्यात लोकांकडून पैसे गोळा करण्याची मोहिम सुरु केली होती. पक्षाच्या सभांमधील खुर्च्यांनादेखील बारकोड चिकटविले होते. तसेच सोशल मीडियावरून आवाहन केले जात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराची साधनसामुग्री जमविण्यासाठी काँग्रेसने 18 डिसेंबर रोजी ‘देशासाठी देणगी’ मोहिम सुरु केली होती. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 1.38 लाख रुपये देणगी देऊन पक्षाच्या ऑनलाइन क्राउडफंडिंग कार्यक्रमाची सुरुवात केली होती.यामाध्यमातून काँग्रेसकडे फक्त 11 कोटी रुपयेच जमले आहेत. यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा हिरमोड झाला आहे. कमी प्रमाणावर देणगी जमा झाल्याने हायकमांडने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कार्यकर्ते आणि नेत्यांना प्रयत्न वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन आठवड्यांत 11 कोटी रुपयांची देणगी पुरेशी नसल्याचे राहुल गांधी, खर्गे आणि प्रियंका वाड्रा यांचे मत आहे. आणखी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवेत अशा सूचना या नेत्यांनी केल्या आहेत.
एआयसीसीचे खजिनदार अजय माकन यांना या सूचना करण्यात आल्या आहेत. पक्षासाठी जास्त पैसे जमविण्यासाठी राज्याच्या संघटनांना संपर्क साधा असे सांगण्यात आले आहे. तसेच आगामी 14 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारत जोडो यात्रेसाठी आणखी वेगळा पैसा जमा करण्यास सांगितले आहे.