जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेले वादग्रस्त विधान हे केवळ मूर्खपणाचे वक्तव्य आहे अशी टीका उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवारी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे .भाजपा आव्हाडांविरुद्ध चांगलीच आक्रमक झाली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी मी बोलण्याच्या ओघात बोललो, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
”जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचे वक्तव्य आहे. प्रसिद्धी मिळवण्याकरिता बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ असे हिंदीतील वाक्य आहे. हा एक त्यांचा स्वभाव आहे. खरे म्हणजे प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत. उगीचच शाकाहारी आणि मांसाहारी असे म्हणून विनाकारण लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवायची. आज आमचे वारकरी, माळकरी, टाळकरी, धारकरी हे सर्व बहुजन समाजातले आहेत. हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक शाकाहारी आहेत. असे विधान म्हणजे यांचा अपमान नाही का? असा माझा प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणे, लोकांच्या भावना दुखावणे आणि अशांतता तयार होईल असे वागणे हे अत्यंत चुकीचे आहे. तसेच मला आश्चर्य वाटते की, जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात, अशी लोक मात्र त्यांच्यावर मौन साधून आहेत. ते काही त्याच्यावर बोळ्याला तयारी नाहीत, त्याचा साधा निषेध करायला तयार नाहीत. त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हेही सगळ्यांच्या लक्षात आले आहे.”
आव्हाडांनी काय वादग्रस्त विधान केले होते?
पक्षाच्या शिबिरामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ”राम आमचा आहे. राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही सर्व जण आम्हाला शाकाहारी बनवायला जाता, मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो म्हणून आम्ही मटण खातो. हाच आहे रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता.१४ वर्षे जंगलात राहणार व्यक्ती शाकाहारी भोजन शोधायला कुठे जाणार?” असे वादग्रस्त विधान केले आहे.