मुंबई : येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात या सोहळ्याचा आंनद जल्लोष पाहायला मिळत आहे. पण, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामध्ये आता भाजपा नेते राम कदम यांनी याबाबत थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यावेळी त्यांनी भगवान रामाची आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंना केला आहे.
राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित म्हटले आहे की, “मा. उद्धव ठाकरे जी, नमस्कार.. मी आपणांस हे पत्र एक हिंदू म्हणून लिहतो आहे.. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही. आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री अन ज्येष्ठ नेते आहात.. आपल्या घटक पक्षातील नेते श्री. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाला मांसाहारी आहेत असे म्हटले, त्यांच्या या राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या विधानावरून देशभर आक्रोश सुरु झाला. अनेक आंदोलने, निदर्शने झाली. संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला.. त्यानंतर त्यांनी माफी मागावी ही अपेक्षा होती. मात्र त्यांनी माफी न मागता उलट प्रभू राम आणी सीता मदिरापण करत होते..अशी प्रभू रामाची चेष्टा करणारे काही कागद दाखवून अजून तीव्र भावना भडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
आज देशभरातील समस्त संत साधू समाज, करोडो रामभक्त आश्चर्य व्यक्त करत आहेत की, आपण अथवा आपले प्रवक्ते संजय राऊत गप्प का? स्वतः मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आव्हाडांवर तुटून पडले. त्यांनी दाखवून दिले की तेच खरे स्वर्गीय बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत. मात्र तुम्ही थंड बसलात..? का ? कुठे गेली तुमची हिंदुत्वची भाषा? मर्दूमकी ? का विसर पडला तुम्हांला शिवरायांचा ?
हा तर प्रचंड गंभीर विषय आहे, समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा गांभीर्याने घेण्याचा विषय असताना सुद्धा आपण मौन का? हा कैक कोटी मिलियन डॉलरचा महत्त्वपूर्ण प्रश्न हिंदू समाजाला पडला आहे. भगवान रामाची आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? अन् नसेल तर आपण अजूनपर्यंत खंडन का केले नाही?
https://twitter.com/ramkadam/status/1743854030504550679
प्रत्येक भाषणात अथवा चर्चेतसुद्धा तुमचा आवडता शब्द मर्द… मर्द… किमान 25 वेळा उच्चारल्याशिवाय किंवा तुमच्या भाषेत किंबहुना.. कोथळा.. कडे कपारी.. महाराष्ट्र धर्म.. कोठे दडलीय ही शब्द संपदा..? त्यामुळे आपण रामभक्तांसोबत आहत की आव्हाडांचे समर्थन करता हे देशभरातील संत साधू समाज आणी हिंदू समाजाला कळले पाहिजे. अन्यथा आपले मौन हे स्पष्ट करेल करेल की आपणास हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही. आणि होय वेळ मिळाला तर जरूर फेसबुकवर देशभरातील साधू संत आणी हिंदू समाज आपल्या मौन असण्याबाबत काय बोलतो आहे ते जरूर पहा. नाहीतर संजय आहेतच तुम्हाला घरबसल्या सर्व सांगण्यासाठी.. महाभारतातील व्यवस्था आजही आपल्याकडे आहे. समस्त हिंदूना आपल्या उत्तरांची अपेक्षा आहे, केवळ शाब्दिक कोट्याची नाही.. धन्यवाद, राम कदम.”
दरम्यान, आता राम कदमांच्या या पत्रावर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.