पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. म्हणजे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक आता होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यामध्ये हा निर्णय देण्यात आला आहे.
पुणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे गिरीश बापट हे खासदार होते. मात्र त्याच्या निधनानंतर येथील जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर तिथे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. मात्र पोटनिवडणुकीच्या कोणतीही हालचाल सुरु नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पोटनिडवणूक घेण्यासाठी आदेश दिले होते. या आदेशाला निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाला स्थगिती दिली आहे. आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता थेट निवडणुकीतच पुण्याचा खासदार कोण हे ठरणार हे निश्चित झाले आहे.