मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. विझलेल्या मशालींच्या उजेड पडत नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी राजापूरातून बोलताना ठाकरेंवर केला आहे. दिवसेंदिवस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष वाढताना दिसून येत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीयेत.
मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, ”कोकणी माणसाचे आणि बाळासाहेबांचे एक अतूट नाते होते. धनुष्यबाणाबरोबर आणि शिवसेनेबरोबर त्यांची नाळ जुळली आहे, बांधिलकी आहे. प्रभू श्रीरामचंद्राचा, बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण आणि सर्वसामान्य माणसांचे धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे. खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे. ही म्हण तुम्ही कोकणी माणसं येणाऱ्या निवडणुकीत खरे करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण, विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही विचारांसाठी आम्ही तत्वाशी लढाई केली. मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल, या महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही केला. आम्ही जे धाडस केले ते संपूर्ण जगाने पाहिले.”
”बाळासाहेब नेहमी सांगायचे सत्ता येते- जाते, पुन्हा येते परंतु, नाव एकदा गेले की ते पुन्हा येत नाही. म्हणून नाव जपायचे असते कारण सत्तेपेक्षा नाव मोठे आहे. सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत. काही लोकांना वाटले की आता हे बाळासाहेबांच्या संपत्तीवर दावा करतील, मात्र त्यावेळेस मी सांगितले बाळासाहेबांची संपत्ती आम्हाला नको. तर बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. संपत्ती तुम्हाला लखलाभ होवो.” कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.