ऐतिहासिक महत्त्वाचे क्षण म्हणून अयोध्यास्थित राम मंदिराकडे पहावे लागेल. संपूर्ण समाजाने एकजूटीने एवढा प्रदीर्घ लढा, सर्व विपरित परिस्थितीत लढून जिंकला आहे. त्यामुळे केवळ एक मंदिर म्हणून नव्हे तर समाज म्हणून एका प्रगल्भ समाजाची जगाला पुन्हा नव्याने ओळख झाली. म्हणून या ऐतिहासिक मंदिराच्या हिंदू समाजाकडून काय अपेक्षा असतील या विषयी आपण अनेक लेखांमधून विचार केला. त्यातील हे अंतिम पुष्प.
जगामध्ये सद्यस्थितीत भारत एका शालिन नेतृत्वाची भूमिका पार पाडत आहे. पण कालपर्यंत तृतीय जग म्हणून हिणवला गेलेला देश, जिथे आज अचानक फक्त राजकीय नेतृत्व बदलाने ही परिस्थिती बदललेली नाही. तर राजकीय नेतृत्वाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून घेऊन वाटचाल केल्यानेच हे बदल घडून आल्याचे दिसत आहे.
त्यामुळे राजकीय नेतृत्वाप्रमाणेच समाजाने सुद्धा वैश्विक नेतृत्वाची धुरा सांभाळली पाहिजे हा संकेत हे राम मंदिर देत आहे. वैश्विक नेतृत्व करण्याची जी जबाबदारी हिंदू संस्कृतीवर आहे त्याची जाणीव अर्वाचीन काळात स्वामी विवेकानंद यांनी हिंदू समाजाला करून दिली. तसेच, विस्फोटक उर्जेने परिपूर्ण असलेला हिंदू समाज व संस्कृती आपले मार्गदर्शन करेल असा विश्वास विश्व समुदायाला दिला होता. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी शिकागो येथे हा शंखनाद झाला होता व तो राजसत्तेने, प्रस्थापितांनी नाही तर एका संन्यासाने केला होता.
वैश्विक सामाजिक सहजीवन यशस्वी व्हायचे असेल तर, फक्त परमत स्वीकार नाही तर परमत आदर करता आला पाहिजे, नव्हे तो स्वभाव बनला पाहिजे तरच, विविधतेतील एकता कळू शकते. जीवनातील गोंधळ तर लगेच कळतो पण प्रत्यक्षात तो गोंधळ नसून त्यात सर्व सुरचित धागा आहे हे अनुभवणे आवश्यक आहे.
ही दोन ही तत्वे समजावून घेतलेला हा हिंदू समाज आहे व फक्त तत्व म्हणून नव्हे तर हजारो वर्षांच्या प्रयत्नांमधून त्याने ही तत्वे आत्मसात केली आहेत.
त्याने परमताचा केवळ स्वीकार नाही तर आदर केला आहे. त्याचे तात्कालिक तोटे, नुकसान सोसले आहे पण तरीही आत्मसात केले आहे. विश्वव्याप हा गोंधळ नसून त्यात एक सुसुत्रता आहे हे देखील जाणून घेतले आहे. त्यासाठी पिंडी ते ब्रम्हांडी हे सूत्र फक्त शिकले नाही तर त्याची अनुभूतीही घेतली आहे. म्हणून हे जग ज्या शांत, निरामय जीवन पद्धतीची वाट पहात आहे ते देण्याची ऐतिहासिक जबाबदारी हिंदू समाजावर येऊन पडली आहे.
अयोध्यास्थित मंदिरासाठीच्या ऐतिहासिक आंदोलनात हिंदू समाजाने वरील दोन ही वैश्विक हिंदू मुल्यांचा व्यवस्थित परिचय जगाला करून दिला आहे. सर्व प्रकारच्या विविधतेवर मात करणारी रामभक्तीची एकात्मता ही किती ताकदवान होती हे जगाने अनुभवले.
आगामी भविष्यासाठी हिंदू समाजाकडून हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हिंदू समाजाने आपल्या व्यवहारातून स्वामी विवेकानंदानी सांगितलेले हे हिंदू तत्वज्ञान सिद्ध करून द्यावयाचे आहे.
मागील लेखात आपण त्याची काही उदाहरणे पाहिली आहेत. आता असुसलेल्या जगाला हे तत्वज्ञान दोन्ही हातांनी भरभरून देण्याची वेळ आली आहे.
#राममंदिर #राष्ट्रमंदिर
– सुनील देशपांडे,९४२०४९५१३२
सौजन्य – विश्व संवाद केंद्र