राजस्थानातील नवनिर्वाचित सरकारचे मंत्री सुरेंद्रपाल सिंग टीटी यांचा राजस्थानातील पोटनिवडणुकीत पराभव झालाय. काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंग कुनुर यांनी 12 हजार 570 मतांनी त्यांचा पराभव केला आहे.
राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा आहेत. परंतु, करणपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार गुरुमीत सिंग कुनूर यांचे निधन झाल्यामुळे ती जागा वगळून 199 जागांवर निवडणूक घेण्यात आली. यापैकी 115 जागांवर विजय मिळवत भाजपने राज्यात सत्ता प्रस्थिपित केली. राज्यात भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्त्वात राज्यात सुमारे 10 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी सुरेंद्रपाल सिंग टीटी यांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. एखाद्या निवडणूक न लढवणाऱ्या व्यक्तीला मंत्री बनवता येते. परंतु, त्याला 6 महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेत निवडून यावे लागते. त्यामुळे भाजपने करणपूर पोटनिवडणुकीत सुरेंद्रपाल सिंग टीटी यांना उमेदवारी दिली. बहुमत पटकावणाऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते विजयी होतील असा भाजपला विश्वास होता. परंतु, पोटनिवडणुकीत मतदारांनी काँग्रेस उमेदवार कुनुर यांच्या बाजुने कौल दिला. त्यामुळे सुरेंद्रपाल सिंग टीटी यांना मिळालेले राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) औटघटकेचे ठरले आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी रुपिंदर सिंग कुनूर यांचे अभिनंदन केले आहे.