श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाला त्यावेळी विरोध करणारे आज श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला आपल्याला बोलवले गेले पाहिजे म्हणून डोळ्यात प्राण आणून वाट पाहात बसले आहेत. एकीकडे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणायचे, गठ्ठा मतांसाठी लांगुलचालन करायचे आणि दुसरीकडे रामभक्त असण्याचा आव आणायचा. रामविरोधी कंपूवर दुर्दैव ओढवले आहे. पाहवतही नाही आणि टाळताही येत नाही ही त्यांची अवस्था हाच संघटित हिंदू शक्तीचा विजय आहे.
ज्या मुलायमसिंहांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव म्हणतात अगर रामललाने बुलाया तो जरूर जाएंगे. ज्यांनी आजवर प्राणपणाने या देशात बाबर जपला, जिवंत ठेवला ते रामललाच्या दर्शनासाठी उतावीळ झाले आहेत. कारसेवेत व अयोध्या आंदोलनात कवडीचाही सहभाग नसलेल्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सामनातून अग्रलेख लिहून आपल्या नव्या ‘धन्या’ला रामभक्त ठरवण्याचा केविलवाणा व हास्यास्पद प्रयत्न केला आहे. सामनाने काँग्रेसला चक्क हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले ते काँग्रेसवर हिंदुत्ववादी असल्याचे शिक्कामोर्तब करू पाहत आहेत. ज्या काँग्रेसने श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाला टोकाचा विरोध केला, ज्यांनी मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे अस्तित्वच नाकारले, ज्यांनी सहिष्णू हिंदूंना दहशतवादी ठरवण्याची योजना आखली, ज्यांनी हिंदुत्व चिरडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, हिंदुत्व द्वेषापायी आजही जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करून त्यांच्या त्यागाची चेष्टा करतात, रामभक्तांवर गोळ्या चालवताना ज्यांना कळवळा आला नाही, गोधरा मध्ये रामभक्तांना जिवंत जाळण्याचा मुद्दा ज्यांना अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी लाभाचा वाटला, धर्मासाठी लढलेल्या शीख समूहाचे शिरकाण करताना जे अग्रभागी होते, त्या काँग्रेसला उद्धव ठाकरे आणि ‘घमंडीया’ आघाडीचे विश्वप्रवक्ते संजय राऊत हे हिंदुत्ववादी ठरवू पाहत आहेत. कॉंग्रेसपेक्षाही जास्त कीव तर उद्धव ठाकरे यांची येते. प्रथम त्यांनी रामभक्तांवर गोळ्या चालवणाऱ्या मुलायमसिंहांच्या पक्षाशी हातमिळवणी केली. आता स्वतःची लाज वाचवण्यासाठी काँग्रेसने हिंदूंवर किती आणि कसे उपकार केले आहेत, याची कपोलकल्पित गाथा मांडली आहे. एकेकाळी मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, असे जाहीरपणे म्हणणारे ठाकरेंना हिंदुत्ववादी दिसू लागले आहेत.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेसला अयोध्येला जाण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी डब्ल्यू एच ओ ला सल्ला दिला होता, असे संजय राऊत सांगतात.
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः ।
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनिः ।।
उंटांच्या विवाह सोहळ्यात गाढवं गीत गातात आणि मग ते परस्परांची प्रशंसा करतात, गाढव उंटाला म्हणतो ‘काय रूप आहे तुमचे! ‘ आणि उंट गाढवाला म्हणतो ‘काय सुरेल आवाज आहे हो तुमचा! अशी राऊत आणि उद्धव यांची गत आहे. डब्ल्यू एच ओ ने तसे कधी स्पष्ट केले नाही. तात्पर्य, कोणीही न मागता सल्ले देण्याची सवय त्यांना जडली आहे. काँग्रेसने या सल्ल्याला किती गंभीरतेने घेतले याचे स्पष्टीकरण अद्यापि काँग्रेसकडून आलेले नाही. जागावाटपावरून काँग्रेसने संजय निरूपम यांना समोर करून उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न नुकताच केला आहे. सोनिया गांधी, खर्गे आणि राहुल गांधी यांनी उबाठा सेनेच्या सल्ल्याला किती गंभीरतेने घेतले, हे लवकरच स्पष्ट होईल. त्यांनी न मागितलेला सल्ला न ऐकल्यास त्याला केराची टोपली दाखवल्याचा अर्थ सांगण्याची आवश्यकता नाही.
मुंब्य्राच्या जितेंद्र आव्हाड या नतद्रष्ट माणसालाही आज राम आठवला. राम मांसाहारी होता म्हणून आम्ही मटण खात असल्याची मुक्ताफळे आव्हाडांनी उधळली. कायम मांसाहारी आणि राममंदिर डोळ्यात सलणाऱ्या शरद पवारांची तळी उचळणाऱ्या आव्हाडांनी अशीच गरळ ओकणे अपेक्षित होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अशावेळी मूग गिळून बसतात. कोथळा, वाघनखे, बुरुज, मर्द, नामर्द, हा शब्दकोश अशावेळी त्यांना आठवत नाही. मंदिरात जात नसतो म्हणणाऱ्या पवारांनाही उद्धव आणि राऊत यांनी सल्ला दिला पाहिजे. आता फक्त मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाला जातीच्या चौकटीत बसवणे शिल्लक होते. आव्हाडांनी आज तोही केविलवाणा प्रयत्न केला. श्रीरामाची जात काढून आपल्या बुद्धीचे दौर्बल्य त्यांनी दाखवले. बाबरी मशिदीसाठी अश्रू ढाळणाऱ्या कंपूच्या डोक्यात राममंदिरच भिनले असणे, हा देखील या दीर्घकालीन लढ्याचा विजय आहे. कारसेवकांच्या सांडलेल्या रक्ताचा हा विजय आहे. श्रीरामजन्मभूमी मुक्ती संग्रामात जो कंपू बाबराला पूजत होता तोच कंपू आज ‘रामनाम’ जपण्यासाठी तयार आहे.
‘जो हिंदू हित की बात करेंगा – वोही देशपर राज करेंगा’ हा देशाचा मूड आहे. संपूर्ण देश 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याच्या तयारीला लागला आहे. या परिस्थितीत श्रीरामाला अव्हेरणे म्हणजे आपले ‘राम नाम सत्य है !’ झाल्याखेरीज राहणार नाही, याची पुरेपूर जाणीव या कंपूला झाली आहे. आज केंद्रात रामभक्तांचे सरकार आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिराचा संकल्प केलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. या सोहळ्याला नख लावण्याचा प्रयत्न मोदी विरोधक प्राणपणाने करणार आहेत. पण देश रामललाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. रामललाचे अभूतपूर्व, ऐतिहासिक, नेत्रदीपक स्वागत होणार आहे.
ये हर दिल की तमन्ना है,
तुम्हे महलो मे हम देखे,
इन आखोंसे मेरे रघुवर,
तेरे मंदिर को हम देखे,
दुआओ का असर है,
अवध मे राम आये है !
– शिवराय कुळकर्णी, प्रवक्ता भाजपा, महाराष्ट्र
9881717827