शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या म्हणजेच १० जानेवारी रोजी लागणार आहे. दुपारी ४ वाजल्यानंतर हा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच निकाल पत्रातील ठळक मुद्दे यावेळेस वाचून दाखवण्यात येणार आहेत. मात्र हा निकाल येण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट झाली होती. या भेटीवर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
गेले दीड वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने वेळेत निकाल द्याव्या अशी सूचना देत ३१ डिसेंबर अशी तारीख दिली होती. ज्याप्रकारे ही सुनावणी सुरु होती, तेव्हाच आमच्या लक्षात आले की हा वेळकाढूपणा करत आहेत. ३१ डिसेंबर नंतर विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला होता. उद्या १० जानेवारी आहे. उद्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत हे वेळ खेचतील आणि वेळकाढूपणा करतील असा टोला त्यांनी लगावला.
ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. याबाबत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका या प्रकरणात असताना विधानसभा अध्यक्षांनी १० जानेवारीला निकाल देणे अपेक्षित आहे. निकालाच्या दोन तीन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जातात. ही कृती पूर्णपणे चुकीचे असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांची ही कृती सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डवर घ्यावी अशी विनंती देखील या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे.