एनडीसीसी बँकेच्या १५३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुनील केदार हे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात होते. सुनील केदार यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका केली होती. नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांना दिलासा दिला आहे. त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत जामिन मंजूर केला आहे. विविध अटी शर्तींसह हा जामिन मंजूर करण्यात आला आहे. एक लाख रुपयांच्या मोबदल्यात हा जामिन मंजूर करण्यात आला आहे. जामिन मिळाल्यामुळे त्यांना आमदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
एनडीसीसी बँकेच्या १५३ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची तसेच १२ लाख ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली होती. २००१ ते २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रा. लि. आणि अन्य खासगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे खरेदी केले होते. मात्र या कंपन्यांकडून कधीच खरेदी केलेलं रोखे बँकेला मिळाले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे रोखे खरेदी करणाऱ्या या खासगी कंपन्या दिवाळीखोर झाल्या होत्या.