आज महाराष्ट्रातील सरकार राहणार की जाणार? याचा फैसला होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी ४ वाजल्यानंतर निकाल देणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की, ठाकरेंचे १४ आमदार अपात्र ठरणार हे आज स्पष्ट होणार आहे. या ऐतिहासिक निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावर माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले, ”आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. आजचा निकाल हा निश्चितपणे कायद्याला धरून असेल. संविधानातील तरतुदींचे पालन करून, सर्वोच्च न्यायालयाने आदेशामध्ये जे म्हटले आहे त्याच्या आधारावरती हा निर्णय असेल. या निर्णयातून सर्वाना न्याय मिळेल. हा निर्णय अत्यंत मूलभूत आणि बेंच मार्क निर्णय असेल. या निर्णयामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत.”
दरम्यान, निकालापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाले आहे. या भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. गेले दीड वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने वेळेत निकाल द्याव्या अशी सूचना देत ३१ डिसेंबर अशी तारीख दिली होती. ज्याप्रकारे ही सुनावणी सुरु होती, तेव्हाच आमच्या लक्षात आले की हा वेळकाढूपणा करत आहेत. ३१ डिसेंबर नंतर विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला होता. उद्या १० जानेवारी आहे. उद्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत हे वेळ खेचतील आणि वेळकाढूपणा करतील असा टोला त्यांनी लगावला.