आज (10 जानेवारी) रोजी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर आता या निकालाबाबत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने मोठा दावा केला आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत दावा केला आहे. आमचाच विजय होईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले आहे की, हा निकाल आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत येईल, अशी माहितीही शिरसाटांनी दिली.
यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, आज आमदार अपात्रतेचा निकाल येण्याची अपेक्षा आहे. आम्ही जो उठाव केला त्याला दिलेले हे एक आव्हान आहे. पण आम्ही जो उठाव केला तो कायद्याच्या चौकटीत बसणारा उठाव आहे. तसेच हा उठाव महाराष्ट्रापुरता सिमित नसून त्याचा परिणाम देशपातळीवर होणार आहे. त्याचबरोबर विजय हा निश्चितपणे आमचाच होईल, असा विश्वासही शिरसाटांनी व्यक्त केला आहे.
तसेच आमदार अपात्रतेच्या या निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निकालाआधी ही भेट झाल्याने ठाकरे गटाने जोरदार टीका केली. यावरही संजय शिरसाटांनी भाष्य केले. ते म्हणाले की, ठाकरे गटाचा स्वभाव हा आरोप करण्याचा आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर, सुप्रीम कोर्टावर आरोप केले आहेत. तसेच कोण कुणाला भेटले हे महत्त्वाचे नसून कायदा काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे.