आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणावर आपला निकाल देणार आहेत. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा निकाल येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की ठाकरेंचे १४ आमदार अपात्र ठरणार की काहीतरी वेगळाच निर्णय येणार याचा फैसला आज होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळी आपली भूमिका मांडत आहेत. ठाकरे गटातील नेते शिंदे आणि इतर आमदारांवर तसेच विधानसभा अध्यक्षांवर आरोप करताना दिसून येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”अध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यावर मी यावर भाष्य करेन व आमची अधिकृत बाजू तुमच्यासमोर मांडेन. मात्र मी इतकेच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने दिली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिले. विधानसभेत आणि लोकसभेत आमच्याकडे बहुमत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. काही जण मॅच फिक्सिंगचा आरोप करतात , आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय ? म्हणजे त्यांचे आमदार , विरोधी पक्षाचे लोक अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते, त्यांच्यावर आम्ही आक्षेप घेतला का ? त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले. त्यांच्या अधिकृत वाहनातून ते आले, रात्रीचे लपून छपून ते आले नाहीत. ते आमदार आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरु आहे त्यासंदर्भात ते आले होते. त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा त्या संस्थेवर मग निवडणूक अयोग्य असेल , उच्च आणि सर्वोच्च न्यायालय असेल टीका करण्याचे प्रकार अनेकवेळा त्यांनी केले आहेत.”
आज संध्याकाळी ४ वाजल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे निकाल आल्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.