शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय आता काही तासांवर आला आहे,शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरणार का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातले आमदार याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज सायंकाळी चार वाजता करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज राजकीय वर्तुळात निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. 16 आमदार जर अपात्र झाले आणि त्यांचे पद गेले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत.घटनात्मक तरतूद काय आहे हे तपासायला हवे ,आजचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल.घटनात्मक पाहिले तर पक्षांतर बंदी कायदा 1985 साली आला. मात्र या कायद्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. या कायद्याला बदलायला हवे असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.