आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साडेचार वाजता निकाल देणार आहेत. या निकालामुळे शिंदेसह १६ आमदार अपात्र ठरतात की ठाकरेंचे १४ आमदार अपात्र ठरतात याचा फैसला होणार आहे. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. गेले दीड वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या ४० आमदारांनी भाजपबरोबर जाऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर दोन्ही गट एकमेकांविरुद्ध न्यायालयात गेले. आजच्या निकालाचे वाचन हे विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. आज दिल्या जाणाऱ्या निकालाचे एक तास वाचन अध्यक्ष करतील त्यातील ठळक मुद्दे सर्वांसमोर मांडले जाणार आहेत. तर त्यानंतर निकालाची परत दोन्ही गटांना दिली जाणार आहे.
मात्र आज जो निकाल अध्यक्ष देणार आहेत, त्या निकालाचे स्वरूप कसे असे असेल याबाबदल काही माहिती समोर येत आहे. निकाल किती पानांचा असेल व त्याचे स्वरूप याबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा निकाल हा सुमारे २०० पानांचा असण्याचा अंदाज आहे. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीसाठी ३४ याचिका दाखल झाल्या होत्या. त्याची सहा गटांमध्ये विभागणी करून ही सुनावणी घेण्यात आली होती. या सर्वांच्या सुनावणीनंतर हे निकालपत्र सुमारे हजार ते बाराशे पानांचे असण्याची शक्यता आहे.
दरम्यान या निकालाबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ”आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. आजचा निकाल हा निश्चितपणे कायद्याला धरून असेल. संविधानातील तरतुदींचे पालन करून, सर्वोच्च न्यायालयाने आदेशामध्ये जे म्हटले आहे त्याच्या आधारावरती हा निर्णय असेल. या निर्णयातून सर्वाना न्याय मिळेल. हा निर्णय अत्यंत मूलभूत आणि बेंच मार्क निर्णय असेल. या निर्णयामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत.”
आजच्या निकालामुळे पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या स्पष्ट होईल. तसेच सुप्रीम कोर्टाच्या या प्रकरणातील मर्यादा देखील स्पष्ट होणार आहेत. तसेच अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकारी देखील स्पष्ट होणार आहेत. तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होणार आहेत.