अयोध्येत 1990 मध्ये कारसेवकांवर तत्कालिन समाजवादी पार्टीच्या सरकारने केलेला गोळीबार अगदी योग्य होता असे प्रतिपादन वादग्रस्त नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे . कासगंजच्या गणेशपूर येथे आयोजित बौद्ध परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
उत्तरप्रदेशात मुलायम सिंह यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्षाचे सरकार असताना 1990 मध्ये कारसेवकांवर गोळीबार झाला होता. अयोध्येतील हनुमान गढीला जाणाऱ्या कारसेवकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये 5 भाविक मृत्यूमुखी पडले होते. या गोळीबाराच्या 23 वर्षांनंतर जुलै 2013 मध्ये मुलायम सिंह यांनी अयोध्येतील गोळीबाराबद्दल खेद व्यक्त केला होता. परंतु, स्वामी प्रसाद मौर्य यांनी हा गोळीबार योग्य ठरवला आहे. संविधान आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी तत्कालीन सरकारने कारसेवकांना अराजकवाद्यांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी तत्कालीन सरकारने आपले कर्तव्य बजावले होते अशा शब्दात मौर्य यांनी गोळीबाराच्या निर्णयाची पाठराखण केली आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या बेताल विधानामुळे देशभरात नाराजी पसरली आहे. अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतानाच स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्यामुळे हिंदु समाजात संताप पसरला आहे. यापूर्वीही संत तुलसीदासरचित रामचरितमानसाच्या ओव्यांवरून देखील मौर्य यांनी वादग्रस्त विधान केले होते.