विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना हाच मूळ राजकीय पक्ष असल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. तसेच राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. तसेच राहुल नार्वेकर यांनी १६ आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळली आहे. म्हणजेच शिंदेंचे १६ आमदार पात्र ठरले आहेत.
२१ जून २०२२ रोजी विधिमंडळाकडे असलेल्या नोंदीनुसार, शिंदे गटाकडे बहुमत आहे. तसेच भरत गोगावले यांचा व्हीप योग्य असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत अस निर्णय नार्वेकरांनी दिला.
दरम्यान, सुरु असलेल्या सुनावणीमध्ये राहुल नार्वेकर यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या १९९९ च्या घटनेचा आधार घ्यावा लागणार आहे, असे सांगत २०१८ ची घटना स्वीकारता येणार नसल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. नार्वेकर म्हणाले, ”२०१८ मधील घटना ग्राह्य धारावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र २०१८ च्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली नोंद ही १९९९ च्या घटनेची आहे. तीच घटना ग्राह्य धरली जाईल. यामुळे ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे.”