NCP MLA Disqualifiaction Case : काल (10 जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये देखील धाकधूक वाढली आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. तसेच या दोन्ही गटांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा लागणार आहे.
6 जानेवारीपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील लढतीशी संबंधित कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच 18 जानेवारीला किवा त्यापूर्वी सर्व संबंधित पक्ष साक्षीदारांची यादी आणि शपथपत्रांची देवाणघेवाण करतील. तर 20 जानेवारीला साक्षीदारांची उलतपासणी होईल आणि 23 जानेवारीला प्रतिवादींची उलटतपासणी होणार आहे. तसेच 25 जानेवारीला अंतिम सुनावणी सुरू होणार असून ती 27 जानेवारीला संपेल. त्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय 31 जानेवारीपर्यंत देतील.
अजित पवार गटाने निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि निवडणूक चिन्ह घड्याळ आम्हाला मिळावे, अशी मागणी अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केली होती. तसेच याबाबत शरद पवार गटानेही याचिका दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेत आपला निर्णय राखून ठेवला आहे.