मुंबई : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार, परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी उपस्थित राहणार नाहीत. याबाबतची माहिती देताना काँग्रसने हा सोहळा भाजप आणि आरएसएसचा असल्याचे म्हटले आहे. तर आता काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घानाचे निमंत्रण नाकारल्याने भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसने प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारले होते. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा 7/12 मागत होते.
पुढे ते म्हणाले की, राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते. रामभक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागले आहे.
https://twitter.com/cbawankule/status/1745300437090148630
यापूर्वी काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावे, असेही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, 22 जानेवारी रोजी होणार्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या सोहळ्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 4,000 संतांना आमंत्रित केले आहे. तसेच 16 जानेवारीपासून सुरू होणारा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा हा सात दिवस चालणार आहे. तर शेवटच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला पहाटे पूजेनंतर, दुपारी ‘मृगशिरा नक्षत्र’मध्ये रामलल्लाचा अभिषेक केला जाणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.