काल विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आपला निकाल दिला. यामध्ये १९९९ च्या घटनेचा आधार घेत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल त्यांनी दिला. तसेच ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांना त्यांनी पात्र ठरवले आहे. या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे सरकार अधिक मजबूत आणि भक्कम झाले आहे. या सर्व निकालावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत हे , सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असे म्हटले आहे.
दरम्यान ‘एक्स’ वर पोस्ट शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल!मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1745086676253262191?t=95fdZ0EEUQYQTyZeTgT8-g&s=19
दरम्यान, काल निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप योग्य रित्या नसल्याचे सांगत ठाकरे गटाच्या आमदारांना देखील पात्र ठरवले आहे. दरम्यान, सुरु असलेल्या सुनावणीमध्ये राहुल नार्वेकर यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या १९९९ च्या घटनेचा आधार घ्यावा लागणार आहे, असे सांगत २०१८ ची घटना स्वीकारता येणार नसल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.